चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी समीक्षा समितीसमोर सादर करण्यात आलेली निवेदनं ही बोगस पध्दतीने भरण्यात आल्याचा सामाजिक कार्यकर्ते डॉ.अभय बंग यांनी आरोप केला आहे. आपल्या आरोपाच्या समर्थनार्थ त्यांनी काही व्हिडिओ सादर केले आहे. डॉक्टर बंग यांनी सादर केलेले हे व्हिडिओ चंद्रपूर शहरातील दोन पानठेल्यांचे आहे. जिथे दारूबंदीला विरोध करणारे हे फॉर्म ठेवण्यात आले होते. डॉ. बंग यांनी पानठेल्यावर येणाऱ्या लोकांकडून हे फॉर्म भरून घेण्यात आल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी समिक्षा समितीला लोकांची 2 लाख 82 हजार 412 निवेदनं मिळाली होती त्यामधील 20 हजार 800 दारुबंदी च्या समर्थनार्थ तर 2 लाख 62 हजार निवेदनं दारुबंदीच्या विरोधात होती. या आरोपांचा माध्यमातून डॉ. अभय बंग यांनी दारू बंदीच्या विरोधात लोकांनी खरंच स्वयंस्फुर्तीने निवेदनं दिलीत का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.


समीक्षा म्हणजे मूल्यमापन. पण या समितीने दारूबंदीचे मूल्यमापन अजून केलेच नसताना उत्पादनशुल्क विभागाने निवडणुकीच्या मतमोजणीपेक्षाही अधिक गतीने, दोन तासात हा आकडा कसा काय जाहीर केला? असा सवाल डॉ. अभय बंग यांनी उपस्थित केला आहे. डॉ. अभय बंग म्हणाले, दारू पुन्हा सुरू करण्याची जणु सुपारी घेऊनच ही 'मत-मोजणी' विद्युतगतीने पूर्ण करून तिची आकडेवारी दारू माफियाच्या हाती गैरप्रचार करायला सोपवली गेली असे यातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे ही दारूबंदीची समीक्षा की दारूच्या संभाव्य गिराईकांची मोजणी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अभय बंग म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 24 लक्ष लोकसंख्येपैकी 11 टक्के लोकांनी 'दारूबंदी नको' असे निवेदन दिले आहे, असे उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केले आहे. गावातील एक दारू दुकान बंद करायला गावातील एकूण वयस्क किंवा महिलांपैकी किमान 50 टक्क्यांनी उपस्थित राहून दारू दुकानाविरुद्ध मत नोंदविल्यास सुरू असलेले दुकान बंद होते. मग याच न्यायाने सूरू असलेली दारूबंदी रद्द करायला किमान 12 लक्ष लोकांचे मत किंवा किमान 8 लक्ष वयस्कांचे मत हवे. या शासकीय निकषावरच ही 'मतमोजणी' पराभूत होते.

Special Report | चंद्रपूरची दारूबंदी उठणार का? समीक्षा समितीच्या अहवलात दारूबंदीला विरोध



दारूबंदीचे फलित व परिणाम मोजण्यासाठी 'निवेदने गोळा करणे' ही कार्यपद्धती अयोग्य आहे. शासकीय पद्धतीने सर्वेक्षण करून परिणाम मोजायला हवे. त्याचे फलित, मोजमापाचे युनिट, निकष, सॅम्पल आदी बाबी काटेकोरपणे ठरवून हे परिणाम मोजावे लागतील. त्याऐवजी निवेदने मागविणे ही लोकप्रियतेची तपासणी असू शकते, परिणामकारकतेची नाही. पाच वर्षापूर्वी दारूबंदीसाठी मोठे जनआंदोलन करणार्‍या या जिल्ह्यातून आता 'दारूबंदी ठेवा' अशी 20,000 निवेदने आणि 'दारूबंदी हटवा' अशी 2 लक्ष 62 हजार निवेदने, असे का घडले असावे ? याचे दोन संभाव्य अर्थ आहेत, असे अभय बंग म्हणाले.

अभय बंग म्हणाले, जागतिक तज्ज्ञांनी भारतातील दारूबंदीचा परिणाम मोजला असता (अमेरिकन ईकोनिमिस्ट रिव्यू) दारूबंदीमुळे पुरूषांचे दारू पिणे 40 टक्के कमी झाले. स्त्रियांवरील अत्याचार व गुन्हे 50 टक्के कमी झाले असे आढळले. म्हणजे दर हजार लोकसंख्येमागे स्त्रियांच्यावरील 40 अत्याचार कमी झााले. 'दारूबंदी उठवा' याचा अर्थ चंद्रपूरचे 80 हजार नवे पुरुष दारू प्यायला लागतील. स्त्रियांवरील अत्याचार दुप्पट होतील व स्त्रियांविरुद्ध एक लक्ष वाढीव गुन्हे व अत्याचार होतील. हे कुणाला हवे आहे.

संबंधित बातम्या :

दारूमुक्तीसाठी बंदी नाही तर प्रबोधन करावं; कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवारांचा सल्ला

डॉ. अभय बंग दारुबंदीवर ठाम; दारुमुक्तीसाठी महाआघाडी सरकारने प्रयत्न करण्याची मागणी