Gadchiroli Police : देशात दरवर्षी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे (Republic Day 2024) औचित्य साधून विविध ठिकाणी विविध सुरक्षा दलांच्या जवानांच्या पथसंचलनाचे आयोजन केले जातं. महाराष्ट्रात देखील पोलीस दलातील विविध घटकांतील पथके आपल्या शिस्तीचे, एकजुटीचे प्रदर्शन पथसंचलनाच्या माध्यमातून दाखवितात. अशातच गेल्या 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत, मुंबई येथे झालेल्या पथसंचलनात भाग घेतलेल्या पथकांमधील उत्कृष्ट पथसंचलन केलेल्या पथकांना शासनातर्फे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.


त्याकरिता गठित करण्यात आलेल्या निवड समितीने उत्कृष्ट पथसंचलनासाठी प्रथम क्रमांकासाठी गडचिरोली (Gadchiroli Police) आणि गोंदिया पोलिसांच्या (Gondia Police) सी-60 पथकाची निवड केली आहे. तर द्वितीय क्रमांक राज्य राखीव पोलीस बल आणि तृतीय क्रमांक बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक, अशा तीन पथकांची यात निवड करण्यात आली आहे.


गडचिरोली पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा


गडचिरोली पोलिस दल आणि गोंदिया पोलीस दलाच्या सी – 60 पथकाने संयुक्तरित्या सर्वोत्कृष्ट पथसंचलन करुन 26 जानेवारी 2024 रोजी शिवाजी पार्क दादर, मुंबई येथे झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनामध्ये प्रथम क्रमांक पटकविला. या कार्यक्रमाला प्रमुख्याने महामहिम राज्यपाल यांची उपस्थिती लाभली होती. त्यावेळी राज्यभरातून आलेल्या विविध पथसंचलनापैकी गडचिरोली पोलीस दल आणि गोंदिया पोलीस दलाच्या सी - 60 पथकाची निवड करण्यात आल्याने, गडचिरोली-गोंदिया पोलिसांमध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. या उत्कृष्ट कामगिरी बद्दल गडचिरोली, गोंदिया पोलीस दलाचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.


प्रजासत्ताक दिनी पथसंचलनामध्ये सर्वोत्कृष्ट पथसंचलन करणा­ऱ्या पथकांना आज दिनांक 29 एप्रिल रोजी राज्याचे अप्पर पोलीस महासंचालकांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे. गडचिरोली पोलीस दलाचे सी - 60 पथके माओवादविरोधी कारवायांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत असतात, त्यासोबतच पथसंचलनामध्ये देखील त्यांनी आपल्या शिस्तीचे आणि एकजुटीचे प्रदर्शन दाखवून दिले आहे. त्यामुळे त्यांची ही कामगिरी साऱ्यांच्या कौतुक आणि अभिनंदनाचा विषय ठरली आहे.


तब्बल 21 वर्षांनंतर खुलं झाले श्रीरामाचे मंदिर 


काही महिन्यांपूर्वी अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. त्यामुळे तब्बल 500 वर्षांची प्रतिक्षा संपली असून प्रदीर्घ काळा लोटल्यावर अखेर प्रभू श्रीरामाचं राम मंदिरात आगमन झालं. 'न भुतो न भविष्यती' असा भव्य-दिव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपूर्ण जगाने अनुभवला. मात्र, अशाच दंडकाराण्यांतील एका मंदिरातील रामरायांना तब्बल दोन दशके आपल्या भक्तांची वाट पाहावी लागलीय. अखेर तब्बल 21 वर्षांनंतर या मंदिरात श्रीरामाचा जयजयकार निनादला आहे. ही गोष्ट आहे छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातली. 


नक्षलवाद्यांनी बंदुकीच्या धाकावर 2003 मध्ये हे मंदिर कायमचे बंद करण्याचा आदेश दिले होते. परिणामी, नक्षलवाद्यांनी या मंदिराचे नुकसान करत या मंदिराचे दरवाजे कायमचे बंद केले होते. मात्र, नुकतेच केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी या मंदिराचे दार गावकऱ्यांसाठी कायमचे खुले केले असून आज या ठिकाणी या मंदिराची डागडुजी आणि स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे एकप्रकारे रामललाचा 21 वर्षांचा वनवास अखेर आता  संपला आहे.


महत्वाच्या इतर बातम्या