Nagpur Crime News नागपूर : राज्याची उपराजधानी नागपुरात (Nagpur) काल, रविवारी दिवसभरात दोन वेगवेगळ्या घटनेत तीन लहान मुलींसोबत अत्याचार झाल्याच्या घटना घडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही घटना नागपुरातील बजाजनगर पोलीस (Nagpur Police) स्टेशन अंतर्गत घडल्या आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही प्रकरणातील संशयित आरोपींना अटक केली असून पुढील चौकशी बजाजनगर पोलीस करत आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
9 आणि 7 वर्षीय मुलीसोबत अत्याचार
यात पहिली घटना बजाजनगर पोलीस स्टेशन अंतर्गत काचीपुरा भागात घडली. काचीपुरा परिसरात घडलेल्या घटनेत संशयित आरोपी दिनेश लिल्हारे (वय 30 वर्ष) हा समोसे बनवतो. काल, रविवारच्या दुपारी दिनेशने त्याच वस्तीत राहणाऱ्या 9 वर्षीय मुलीसोबत लैंगिक छळ केला. अचानक घडलेल्या या घटनेनंतर पीडित मुलगी रडून आपल्या कुटुंबीयांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आणि त्यानंतर वस्तीत एकच गोंधळ माजला. ही घटना उजेडात येताच त्याच वेळेस एका 7 वर्षीय मुलीने ही संशयित आरोपी दिनेशने दोन दिवसांपूर्वी तिच्या सोबत तसेच लैंगिक छळाचे प्रकार केल्याची माहिती तिच्या आई वडिलांना दिली.
त्यानंतर वस्तीतील संतप्त लोकांनी एकत्रित येऊन संशयित आरोपी दिनेश लहारेच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपी दिनेश लील्हारे ला अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची पुढील कायदेशीर चौकशी करत असून आशाच प्रकारच्या आणखी काही घटना घडल्या आहेत का त्या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत.
परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट
अशाच प्रकारची आणखी एक घटना दंतेश्र्वरी परिसरात घडली. या घटनेत 4 वर्षीय पीडित मुलीसोबत परिसरात राहणाऱ्या 15 वर्षीय संशयित आरोपीने मुलीला खेळायला नेतो, असं सांगून तिच्यावर शेजारच्या घरात लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर या प्रकरणाची माहिती पीडित मुलीने कुटुंबीयांना दिली असता हा सर्व प्रकार उजेडात आला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी याबाबत माहिती बजाजनगर पोलिसांना देत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन अल्पवयीन 15 वर्षीय संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. मात्र, या घटनेतील पीडित मुलीची शारिरीक अवस्था सध्या बरी नसल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी या कृत्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या