माळशिरसमध्ये स्मशानभुमीकडे जाण्यास रस्ता न दिल्याने संतप्त दलित कुटुंबाकडून ग्रामपंचायती समोर अंत्यसंस्कार, पोलीस प्रशासनावरही गंभीर आरोप
माळशिरस तालुक्यातील माळेवाडी येथील साठे कुटुंबाने गावात ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंत्यसंस्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पंढरपूर : पूर्ववैमनस्यातून एका अंध दलित व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला रस्ता न मिळू दिल्याने माळशिरस तालुक्यातील माळेवाडी येथील साठे कुटुंबाने गावात ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंत्यसंस्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत्यूनंतर वैर संपते म्हणतात मात्र ग्रामीण भागात आजही जातीयवाद किती टोकाला गेलाय याचे लाजिरवाणे उदाहरण माळेवाडी येथे पाहायला मिळाले आहे. या प्रकरणात पोलिसांवर होणारे गंभीर आरोप देखील धक्कादायक असून त्याची वरिष्ठ पातळीवर चौकशी न झाल्यास जातीयवादाचे धिंडवडे या पुरोगामी महाराष्ट्रात असेच निघत राहतील.
माळेवाडी येथील सरपंच दशरथ साठे यांचे अंध बंधू धनाजी साठे यांचे काल पहाटे दोन वाजता निधन झाले. यानंतर कुटुंब सकाळपासून अंत्यसंस्काराच्या तयारीला लागल्यावर गावातील काही मंडळींनी स्मशानभूमीकडे जाऊ देण्यास अडवणूक केल्याचा आरोप दशरथ साठे यांनी केला आहे. या गावातील मंडळींना पोलीस प्रशासनाकडून सहकार्य मिळत असल्याने आम्हाला अंत्यसंस्काराला जाण्यास अडवणूक केली गेल्याचा गंभीर आरोप साठे कुटुंबाने केली आहे.
मृतदेह घेऊन जाणाऱ्या गाडीला पोलीस गाडीही आडवी लागली होती. गाडी बंद पडल्याचे पोलीस साठे कुटुंबाना सांगत असल्याने अखेर साठे कुटुंबाने अंत्यसंस्कार अकलूज येथे करण्याचा निर्णय घेऊन निघाले असताना पुन्हा पोलिसांकडून अडवणूक झाल्याचा गंभीर आरोप साठे कुटुंबाने केला आहे. अखेर कोणताच मार्ग न उरल्याने मृतदेहाची होत असलेली विटंबना थांबवून गावातील ग्रामपंचायती समोर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या सर्व प्रकरणात पीडित साठे कुटुंबाकडून यापूर्वी दोन अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करूनही पोलीस योग्य तपास करत नसल्याचा त्यांचा आक्षेप आहे. माळेवाडी येथील हा सर्व प्रकार दुर्दैवाने पोलिसांच्या समोर चालला होता. आता पोलिसांनी साठे कुटुंबाला अंत्यसंस्कापासून रोखणाऱ्या माळेवाडी गावातील 13 जणांवर दंगल आणि अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आला आहे. तर ग्रामसेवकाच्या तक्रारीवरून ग्रामपंचायतीसमोर अंत्यसंस्कार करणाऱ्या साठे कुटुंबावरही गुन्हा दाखल झाला आहे.
एकंदर गावातील राजकारण आणि त्यातून जातीपातीत तयार झालेली तेढ एखाद्याच्या मृत्यूनंतरही संपत नाही हे दुर्दैवी असून यात खऱ्या अर्थाने योग्य मार्ग काढण्याची जबाबदारी असणारे पोलीस प्रशासन देखील यात कमी पडल्यानेच आता पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप होऊ लागले आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात एखाद्या दलित मृतदेहाच्या अंत्यसंस्काराला आजही रास्ता मिळू नये हे नक्कीच राज्यकर्ते आणि प्रशासनासाठी लाजिरवाणे आहे.