नागपूर : भारतीय जवान सीमेवर प्रतिकूल परिस्थितीत जीवाची पर्वा न करता लढा देत असतात. देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी लढा देणाऱ्या जवानांसाठी आपणही काही करावे असं प्रत्येकाला वाटतं. याच भावनेतून चिखली तालुक्यातील केळवदच्या एका सलून व्यावसायिकाने अनोखा उपक्रम सुरू केला आहे. सैनिक आणि माजी सैनिकांची चांदीच्या वस्ताऱ्याने नि:शुल्क दाढी करून देत आहे.
जवानांविषयी असलेल्या आदरातून आपण 15 हजार रुपये किमतीचा चांदीचा वस्तरा खरेदी केल्याचे तो सांगतो. उद्धव गाडेकर असं या सलून व्यावसिकाचं नाव आहे. चिखली-बुलडाणा रोडवर केळवद येथे उद्धवचं सलून आहे. देशासाठी तैनात असणारा जवान गावात परत येतो तेव्हा त्यास समाजाकडून मान-सन्मान व आदर मिळाला पाहिजे. तो आदर मिळाल्यास जवानांना आपल्या श्रमाचे मोल झाल्यासारखे वाटेल, असं उद्धवला वाटते.
भारतीय सैनिकांसाठी आपण काहीच करू शकत नाही का? या प्रश्नातूनच आपल्याला हा उपक्रम सुचला. त्यानंतर आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून सैनिकांसाठी मोफत दाढी-कटिंग करण्यास सुरुवात केल्याचे उद्धवने सांगितले.
यापूर्वीही उद्धवने मुलाची आस न धरता मुलीवर कुटुंब नियोजन करणाऱ्या बापाची नि:शुल्क दाढी करण्याची संकल्पना राबवून ‘बेटी बचाओ’चा संदेश दिला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने याची दखल घेतली होती. याच प्रमाणे उद्धव अंध अपंग यांची दाढी कटिंग फ्री करीत आहे तर जे रक्तदान करतील त्यांची दाढी कटिंग सहा महिने फ्री करण्याचा त्याचा संकल्प आहे.