वर्धा : राज्यात डॉक्टरांवर हल्ले, शिवीगाळ करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सात ते आठ दिवसांपूर्वी वर्ध्यात खासगी रुग्णालयात ऑक्सिजन बेड नसल्यानं रुग्णाला दुसऱ्या दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला. पण, तिकडे रुग्ण दगावला. रुग्णाला का तपासले नाही, असं म्हणतं रुग्णाचा मुलगा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सात दिवसांनंतर दवाखान्यात जाऊन गोंधळ घालून डॉक्टरला शिवीगाळ करत धमकावलं आणि कारच्या काचा फोडल्यात.


वर्ध्यात डॉ. सचिन तोटे यांच्या श्री हॉस्पिटलमध्ये आठवड्यात या रुग्णालयात नौशाद शौकत अली याने आईला उपचारासाठी आणलं होतं. नर्सनं तपासणी करून ऑक्सिजन लेव्हल कमी असल्याचं सांगितलं. त्यावेळी ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यास सांगितलं. पण, तरीही त्यांनी वाट बघितली. नंतर दुसऱ्या दवाखान्यात नेलं असता रुग्णाचा मृत्यू झाला. 


जवळपास सात दिवसांनी डॉक्टरांनी का तपासलं नाही, यावरून वाद घालत चार जणांनी दवाखान्यात गोंधळ घातला. डॉक्टरांना शिवीगाळ करत मारण्यास स्टुल उचलला. यावेळी डॉक्टरांच्या मोठ्या भावाला धक्काबुक्की करण्यात आली. डॉक्टरांनी समजूत काढत त्यांना शांत करत परत पाठवलं. पण जाताना डॉक्टरांच्या कारच्या काचा फोडल्या. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली.


याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आशिफ शौकत अली सैय्यद, नौशाद शौकत अली सैय्यद, इरफान खाँ पठाण, सागर झाडे अशा चार जणांवर गुन्हा दाखल केलाय. यातील आसीफ शौकत अली सैय्यदची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं पोलिसांकडून समोर आलं आहे. इतरांची अधिकची माहिती समोर आली नाही. पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे. एकीकडे कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढलाय. त्यात अशा घटना डॉक्टरांकरता तापदायक ठरत आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी पावलं उचलण्याची गरज निर्माण झालीये.


इतर महत्त्वाच्या बातम्या