कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या धाकट्या भावाचं आज (15 मे) निधन झालं. असीम बॅनर्जी यांना कोरोनाची लागण झाली होती आणि मागील एक महिन्यापासून त्यांच्यावर कोलकातामधील मेडिका सुपरस्पेशॅलिटी रुग्णालयात उपचार सुरु होते. 


ममता बॅनर्जी यांच्या भावाच्या निधनानंतर कुटुंबात दु:खांच वातावरण आहे. रुग्णालयातून मृतदेह मिळाल्यानंतर कोरोना प्रोटोकॉलनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती कुटुंबातील सदस्यांनी दिली आहे.


मेडिका सुपरस्पेशॅलिटी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. आलोक रॉय यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची धाकटे बंधु असीम बॅनर्जी आज सकाळी रुग्णालयात निधन झालं. सकाळी त्यांची प्रकृती बिघडली होती. ते कोरोनाबाधित होते आणि त्यांच्यावर उपचार सुरु होते."


पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग
पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे.  दरदिवशी नव्या कोरोनाबाधितांच्या नोंदीचा विक्रम होत आहे. पश्चिम बंगालमध्ये शुक्रवारी (14 मे) एकाच दिवशी 20,846 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या वाढून 10 लाख 94 हजार 802 झाली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार 136 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत मृतांची एकूण संख्या 12 हजार 993 पोहोचली आहे. 


30 मे पर्यंत शाळा, कॉलेज बंद
दरम्यान वाढत्या कोरोना संसर्गमुळे 30 मे पर्यंत शाळा, कॉलेजसह शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे निर्देश देम्यात आले आहेत. याशिवाय सरकारी आणि खासगी कार्यलयंही बंद राहती. केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु राहतील. याशिवाय लोकल ट्रेन, मेट्रो सेवा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. तर सर्व राजकीय, प्रशासकीय आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे.