नवी दिल्ली : भारतात कोरोना लसीकरणाचा तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. पण देशासमोर कोरोनाच्या लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरणाची गती मंदावली आहे. आता त्यावर उपाय म्हणून सरकारच्या वतीनं लसी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारत सरकार आणि अमेरिकन लस निर्मिती करणारी कंपनी फायझर यांच्या दरम्यान एक उच्च स्तरीय चर्चा अंतिम टप्प्यात आली असून या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत देशाला पाच कोटी लसीचे डोस मिळण्याची शक्यता आहे.
भारतात सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींच्या वापराला मंजुरी मिळाली आहे. त्यात आता रशियाच्या स्पुटनिक व्ही या लसीची आयात करण्यात आली आहे. फायझर आणि मॉडर्ना या कंपनींनी त्यांच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळावी अशी विनंती भारत सरकारकडे केली होती. आता फायझरच्या लसीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता असून मॉडर्नासोबतही चर्चा सुरु असल्याचं सांगण्यात येतंय.
भारत सरकारने सुरू केलेल्या कोरोना लसीकरणाच्या व्यापक कार्यक्रमासाठी अमेरिकन लस उत्पादन करणारी कंपनी फायझरने 'ना नफा' या तत्वावर म्हणजे कोणताही आर्थिक फायदा न कमावता लसीचा पुरवठा करण्याची ऑफर भारत सरकारला दिली होती. त्या संबंधी भारत सरकारशी चर्चा सुरू आहे अशी माहितीही कंपनीच्या वतीने त्यावेळी देण्यात आली होती.
अमेरिकेत 12 वर्षावरील बालकांना Pfizer ची लस मिळणार
अमेरिकेतील 12 वर्षावरील बालकांना Pfizer ची कोरोना लस देण्यास अन्न आणि औषधं प्रशासनाकडून (FDA) मान्यता मिळण्याची शक्यता आहे. तशा प्रकारची मान्यता याच आठवड्यात मिळण्याची शक्यता असून पुढच्या आठवड्यापासून 12 ते 15 वयोगटातील बालकांना कोरोनाची लस देण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. अमेरिकेतल्या 16 वर्षावरील सर्वांना Pfizer ची लस देण्याच्या निर्णयाला या आधीच मंजुरी मिळाली आहे.
Pfizer कंपनीने 12 ते 15 वयोगटातील बालकांवर आपल्या लसीच्या उपयुक्ततेचा अभ्यास गेल्या काही महिन्यांपूर्वीच केला आहे. त्यामध्ये ही लस बालकांवरही प्रभावी असल्याचं समोर आलं होतं.
महत्वाच्या बातम्या :