सहा महिन्यांनी मनमाडमधून पहिली ट्रेन मुंबईकडे धावली, आजपासून आणखी 86 विशेष गाड्या धावणार!
सहा महिन्यांनी आज मनमाड इथून पहिली ट्रेन प्रवाशांना घेऊन मुंबईला धावली. तर आजपासून देशभरात आणखी 86 विशेष ट्रेन धावणार आहेत.
मनमाड : कोरोनाव्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून राज्यांतर्गत ट्रेन बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र रेल्वे विभागाने बारा गाड्यांना परवानगी दिल्यानंतर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून मनमाड इथून पहिली ट्रेन प्रवाशांना घेऊन मुंबईला धावली.
नाशिक जिल्ह्यातील हजारो प्रवाशांना घेऊन मुंबईपर्यंत धावणारी पंचवटी एक्सप्रेस सुरु करावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती. अखेर रेल्वे प्रशासनाने ती मागणी पूर्ण केल्यानंतर आज सकाळी सहा वाजता पंचवटी एक्सप्रेस विशेष ट्रेन निघाली. मात्र या गाडीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आगाऊ तिकीट आरक्षण केल्यानंतरच प्रवास करण्याची परवानगी असल्याने, किमान चाकरमान्यांना पासची सवलत मिळावी अशी मागणी करण्यात आली.
आज पहिलाच दिवस असल्याने फारसे आरक्षण झाले नसल्याने गाडी तशी रिकामीच गेली. आज मुंबईपर्यंत केवळ सेकंड क्लासचे 320 तर आठ प्रवाशांनी मुंबईपर्यंत आरक्षण केलं होतं. आज गाडीला फारसे प्रवाशी नसले तरी सोमवारपासून त्यात वाढ होईल अस रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. तर गाडी सुरु झाल्याचा आनंद प्रवाशांनी व्यक्त केला मात्र पास धारकांना प्रवास करायला मिळावा अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.
आजपासून आणखी 86 विशेष ट्रेन धावणार भारतीय रेल्वेने अनलॉक-4 अंतर्गत आजपासून देशभरात 86 आणखी विशेष ट्रेन सुरु केल्या आहेत. यापैकी मुंबई-मनमाड, सोलापूर-मैसूर आणि परभणी-हैदराबाद या तीन ट्रेन महाराष्ट्रासाठी आहेत. उर्वरित काही गाड्या महाराष्ट्रातून प्रवास करणाऱ्या आहेत. या 86 गाड्यांसाठी बुकिंग विण्डो 10 सप्टेंबरपासून सुरु केली होती. रेल्वे या ट्रेन वगळता 12 मेपासून 30 विशेष राजधानी ट्रेन आणि 1 जूनपासून 200 विशेष मेल/एक्स्प्रेस ट्रेन चालवत आहे. या 86 गाड्यांमुळे आगामी सणांसाठी ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. आम्ही टप्प्याटप्प्याने प्रत्येक मार्गावर ट्रेन सुरु करत आहोत, असं रेल्वेने सांगितलं. रेल्वेना आजपासून सुरु केलेल्या ट्रेनमध्ये रिझर्वेशनशिवाय स्टेशनवर प्रवेश मिळणार नाही. शिवाय प्रवाशांनी कमीत कमी 90 मिनिटं आधी स्टेशन पोहोचावं, जेणेकरुन कोरोना प्रोटोकॉल पूर्ण करता येईल. कोरोना नसलेल्या प्रवाशांनाच ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी आहे.