Bhivandi Fire : भिवंडीत आगीचे सत्र काही थांबताना दिसत नाही. भिवंडी ग्रामीण भागात एकदा पुन्हा अग्नितांडव पाहायला मिळालं आहे. तालुक्यातील कशेळी गावच्या हद्दीत असलेल्या चामुंडा कॉम्पलेक्स परिसरातील फर्निचर मार्केटमध्ये फर्निचरच्या गोदामाला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण फर्निचर गोदाम जळून खाक झाले आहेत. कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले.
गोदामाला लागलेल्या भीषण आगीमुळे इतर दोन फर्निचर गोदामांना आग लागली. त्यामुळे या आगीत तीन फर्निचर गोदाम जळून खाक झाली. गोदामाला लागलेली आग नियंत्रित करण्यासाठी भिवंडी अग्निशमन दल आणि ठाणे अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. जवळपास पाच तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आग लागलेल्या गोदामात मोठ्या प्रमाणावर फर्निचर तयार करणारे मशीन आणि फर्निचर होते. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
गोदामाला आग लागल्याची माहिती समजताच स्थानिकांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र, आग पसरत असल्याचे लक्षात येताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आग लागलेला परिसर हा फर्निचर बाजार आहे. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यास अपयश आले असते तर इतरही दुकाने, गोदामे आगीत खाक झाली असती. भिवंडीमध्ये आग लागण्याच्या घटना घडत असल्याने अनेक चर्चा सुरू आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- कोकण रेल्वेसाठी ऐतिहासिक दिवस! पहिल्यांदाच इलेक्ट्रिक इंजिनवर एक्सप्रेस चालली
- Beed: केज नगरपंचायतमधील राष्ट्रवादीचा नगरसेवक निघाला चंदनतस्कर; गुन्हा दाखल
- Mumbai: मुंबई गुन्हे शाखेला मोठं यश, सात कोटींच्या बनावट नोटांसह 7 जणांना अटक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha