बीड: केज नगरपंचायत निवडणुकीमध्ये नुकताच नगरसेवक बनलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर चंदन तस्करी संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात केज नगरपंचायतीचा नवनिर्वाचित सदस्य बाळासाहेब जाधव यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
अंबाजोगाई कारखाना परिसरात देवराव कुंडगर यांच्या शेतात बाळासाहेब दत्तात्रय जाधव (रा. केज) हा बेकायदेशीररित्या स्वतःच्या फायद्यासाठी काही इसमांना एकत्र जमवून परिसरातील चंदनाची झाडे तोडायचा. ती तोडलेली झाडं देवराव कुंडगर याच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये तासून, त्यातील चंदनाचा गाबा काढून पांढऱ्या पोत्यांमध्ये भरून शेडमध्ये ठेवायचा अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावात यांना मिळाली.
सदर ठिकाणी जाऊन पोलिसांनी छापा मारला असता एक इसम जागीच सापडला. आणि त्यांच्या ताब्यातील पत्र्याचे शेडची व परिसराची पंचा समक्ष झडती घेतली असता सदर ठिकाणच्या पत्र्याच्या शेडमध्ये पांढऱ्या पोत्यामध्ये 27 किलो चंदनाच्या झाडाच्या खोडामधून काढलेला चंदनाचा गाभा आढळला. त्याची किंमत 67 हजार 500 रुपये असून त्या ठिकाणी 10 हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल असा एकूण 85 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, देवराव कुंडगीर याला सदरचा माल कोणाचा आहे असे विचारले असता त्याने सांगितले की, सदरचा माल हा बाळासाहेब दत्तात्रय जाधव (रा. केज) याचा असून त्याच्या सांगण्यावरून त्याचा मुनीम सतीश आणि मी असे दोघे जण माल घेतो.
या प्रकरणी तीन आरोपींच्या विरुद्ध पोलीस ठाणे अंबाजोगाई ग्रामीण येथे गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणातील नगरसेवक आरोपी बाळासाहेब जाधव हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :