बीड : बीड जिल्ह्यामध्ये चाईल्ड पॉर्नोग्राफीचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दोन लहान मुलांचे व्हिडीओ एका वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहेत. हा सगळा गंभीर प्रकार मुंबई सायबर क्राईमच्या निदर्शनास आला. हे व्हिडीओ बीडमधून अपलोड झाल्याची माहिती सायबर क्राईम सेलने बीड पोलिसांना कळवली. यानंतर परळी, गेवराईमध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे. यामागे कुठलं रॅकेट आहे का याचा तपासही पोलिसांकडून करण्यात येत आहे.


मुंबई डीजी ऑफिसअंतर्गत चालणाऱ्या सायबर सेलकडून राज्यभरातून अशा एकूण 27 व्हिडीओंवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यापैकी दोन व्हिडीओ हे हे बीड जिल्ह्यातून अपलोड झाल्याचं पोलिसांना आढळलं. एक व्हिडीओ गेवराई तर दुसरा व्हिडीओ परळीमधून अपलोड झाला आहे.


हे व्हिडीओ बीडमध्ये तयार करण्यात आले की नाही याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र व्हिडीओ पॉर्न साईट्सवरुन डाऊनलोड करुन सोशल मीडियावर शेअर केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. शिवाय या व्हिडीओमधील पीडित मुलं ही बीड जिल्ह्याबाहेरची आहेत. तर हे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करणारी व्यक्ती बीड जिल्ह्यातील आहे की बाहेरची की यामागे एखादं रॅकेट आहे, याचाही तपास सुरु आहे.


बाल लैंगिक अत्याचाराचे व्हिडीओ फेसबुकसह इतर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर दिल्लीच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने यासंदर्भात महाराष्ट्राचे सायबर क्राईमचे विशेष पोलीस महानिरीक्षकांशी संपर्क साधला. त्यांना 18 डिसेंबर 2019 रोजी कायदेशीर कारवाई करण्याची सूचना केल्या होत्या. त्यानुसार राज्यातील सर्वच सायबर क्राईम पोलीस ठाण्यांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.