Pune PMC News : पुणे शहरात आता रस्त्यांवर थुंकणाऱ्यावर (Pune) करडी नजर असणार आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात जी-20 परिषद पार पडली. त्यावेळी (PMC)  शहरात सुशोभिकरण करण्यात आलं. त्याच पार्श्वभूमीवर शहरातील पिचकारी बहाद्दरांवर महापालिकेने कारवाई करायला सुरुवात केली होती. ही कारवाई आता कायम राहणार आहे. मागील 18 दिवसांत महापालिकेने या पिचकारी बहाद्दरांकडून तीन लाखांचा दंड वसूल केला आहे. 


आतापर्यंत महापालिकेने 353 जणांवर कारवाई केली आहे. जी-20 परिषदेची कामं सुरु असताना दहा दिवसांत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 23 जणांवर कारवाई केली होती. त्यांच्याकडून 23 हजारांचा दंड वसूल केला आहे.सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि अस्वच्छता करणाऱ्या 422 जणांकडून 1 लाख 46 हजार 420 रुपयांचा दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांकडून 2 हजार 600 रुपये वसूल केला आहे.  17 ठिकाणी कचरा जाळणाऱ्यांकडून 9 हजार 500, वर्गीकरण न करता कचरा दिल्याबद्दल 30 जणांकडून 3 हजार 760  रुपये दंड वसूल केला आहे. बांधकामाचा कचरा टाकणाऱ्या दहा जणांवर कारवाई करून 38 हजार, प्लास्टिक कारवाई सात ठिकाणी करून 35 हजाराचा दंड वसूल केला आहे.


रस्ता पुसायला लावला...


कादी दिवसांपूर्वी रस्त्यावर थुंकणाऱ्यांनाच पुणे महापालिकेने आणि पोलिसांनी सफाई करायला लावत अद्दल घडवली होती. त्याला भररस्त्यात थुंकलेली घाण साफ करायला लावली होती. याचा व्हिडीओ पालिकेने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओवर पुणे पोलिसांनी कमेंट्सदेखील केल्या होत्या. त्यानंतरदेखील पुणेकर रस्त्यांवर थुंकणं कमी करतील आणि शहर स्वच्छ करण्यात हातभार लावतील, अशी महापालिकेला अपेक्षा होती. मात्र तसं चित्र काही दिवस झालं समोर आलं नाही. उलट या पिचकारी बहाद्दरांकडून वसूल केलेल्या दंडाची किंमत पाहता पिचकारी बहाद्दरांच्या संख्येत वाढ झाल्याचं चित्र आहे. 


कारवाई कायम राहणार...


जी-20 परिषदेसाठी पुण्यातील अनेक परिसरात स्वच्छता करण्यात आली होती. शहर चकाचक करण्यात आलं होतं. शहरभर सुशोभिकरण करण्यात आलं होतं. पुण्यात परदेशी पाहुण्यांच्या आगमनासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. त्याच काळात रस्त्यांवर थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. मात्र आता ही कारवाई कायम ठेवणार आहे. पुणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रोज अनेक नागरिकांवर कारवाई करत त्यांच्याकडून दंडवसुली केली जात आहे.


ही बातमी देखील वाचा


PHOTO: एका विद्यार्थ्यासाठी सुरु आहे झेडपीची शाळा, शिक्षकही एकच! वाशिममधील जिल्हा परिषदेच्या शाळेची अनोखी कहाणी