PHOTO: एका विद्यार्थ्यासाठी सुरु आहे झेडपीची शाळा, शिक्षकही एकच! वाशिममधील जिल्हा परिषदेच्या शाळेची अनोखी कहाणी
जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांवर इंग्रजी शाळांचं अतिक्रमण झाल्याची तक्रार नेहमी केली जाते. यावरुन राजकीय नेतेमंडळी देखील रान उठवताना दिसून येतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र प्रत्यक्ष काही विशेष पावलं झेडपी शाळांची विद्यार्थी संख्या वाढावी यासाठी होताना दिसून येत नाही. काही जिल्हा परिषद शाळांच्या सक्सेस स्टोरी आपण पाहत असलो तरी अनेक शाळांची अवस्था ही गंभीर असल्याचं चित्र दिसून येतं. आता आपण एका अशाच शाळेचं उदाहरण पाहणार आहोत. तुम्ही जिल्हा परिषदेची एखादी अशी शाळा बघितली का ज्यामध्ये एकच विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्याला धडे देण्यासाठी एकच शिक्षक आहे. हो हे खरं आहे. अशी शाळा आहे वाशीम जिल्ह्यातील गणेशपूर गावात.
वाशिमच्या गणेशपूर (गुरव ) गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. इथं पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेण्याची सोय आहे.
मात्र विद्यार्थी संख्या कमी असल्याने या शाळेत शिक्षणाचे धडे घेण्यासाठी केवळ एकच विद्यार्थी आहे. तो तिसऱ्या वर्गात शिकतो. त्या विद्यार्थ्याचे नाव कार्तिक शेगोकार आहे.
तर या शाळेचे मुख्याध्यापक किशोर मानकर असून ते नित्यनेमाने ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. गणेशपूरची ही शाळा 1958 साली स्थापन झाली होती. या शाळेत शिकून काही विद्यार्थी नोकरीवर देखील लागले आहेत.
गावची लोकसंख्या 200 इतकी आहे तर घराची संख्या 30 आहे तर गावात पहिली ते चौथीपर्यंत एकूण 4 विद्यार्थी आहेत. मात्र गावातील 3 विद्यार्थी हे कारंजा शहरात शिक्षण घेत आहे. तर त्यापैकी कार्तिक हा एकटाच तिसऱ्या वर्गात शिक्षणाचे धडे गिरवत आहे.
घरची परिस्थिती हलाखीची असल्याने बाहेर गावी इंग्रजी शाळेत शिक्षण घेणे परवडणारे नसल्याने गावात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ज्ञान घेण्याचं कार्य कार्तिक करत आहे.
गेल्या काही दशकापासून इंग्रजी शाळेकडे पालकांचा कल वाढतोय.
त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडायला लागल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणजे राज्यात जिल्हा परिषद शाळेत कमी पटसंख्या असल्यास शाळा बंद करण्याचे निर्णय प्रस्तावित आहेच.
मात्र असं असलं तरी एका विद्यार्थ्यासाठी शिक्षकाची धडपड आणि शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्याची धडपड एक चर्चेचा विषय अन् आदर्श ठरत आहे.