सोलापूर : राज्यात सध्या ऑक्सिजन तुटवड्याबाबत रोज बातम्या पाहतो. दुर्दैवाने यात ऑक्सिजन अभावी अनेकांचे जीवही जात आहेत. अशावेळी पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. अरविंद गिराम यांनी सुरु केलेल्या नॉन रिब्रिथिंग मास्कमुळे या हॉस्पिटलचा ऑक्सिजनचा प्रश्न सुटला आहे. कोविड रुग्णांना लावण्यात येणाऱ्या ऑक्सिजन मास्कच्या ऐवजी हा नॉन रिब्रिथिंग मास्क वापरल्याने रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन मिळून ऑक्सिजनची 50 टक्क्यापर्यंत बचत होऊ लागली आहे. हा प्रयोग राज्यातील इतर ठिकाणी केल्यास ऑक्सिजन तुटवड्यावर हा रामबाण इलाज ठरणार असून यामुळे ऑक्सिजन अभावी जाणाऱ्या अनेकांचे प्राणही वाचणार आहेत. 
          
पंढरपूरमध्ये कोरोनाचे महासंकट सुरु असल्याने उपजिल्हा रुग्णालयात 50 ची क्षमता असताना जवळपास तिप्पट रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील खाजगी हॉस्पिटलची अवस्था देखील तशीच आहे. शहरातील लाईफ लाईन या सर्वात मोठ्या हॉस्पिटलमध्ये जवळपास 225 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मात्र, उपचारांपेक्षा ऑक्सिजन सिलेंडर मिळविण्यातच सगळी ऊर्जा खर्च होत असल्याचे डॉ. संजय देशमुख सांगतात.


या हॉस्पिटलचा गाडा ओढणाऱ्या डॉ. मंजुषा देशमुख यांनीही ऑक्सिजन तुटवड्यामुळे रोज दोन तास देखील झोप मिळत नसल्याने सरकारने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अशातच डॉ. गिराम यांनी केलेल्या या प्रयोगाचा जादुई परिणाम साधत हे वेगळ्या प्रकारचे मास्क वापरत ऑक्सिजनची बचत करण्यास सुरुवात केली आहे. उपजिल्हा रुग्णालयाला रोज 110 सिलेंडर लागत होते. मात्र, या मास्कचा वापरानंतर ही गरज केवळ 40 सिलेंडरपर्यंत कमी झाली आहे. 


रूग्णांना सामान्यतः पाईप अथवा मास्कच्या माध्यमातून ऑक्सिजनचा पुरवठा होतो. असा ऑक्सिजन पुरवठा रूग्णांना होत असताना. रूग्णाने मिळालेल्या ऑक्सिजनच्या आधारे श्वास घेउन उश्वास बाहेर सोडत असताना संबधित शरीरातील कार्बन डायऑक्साईड नव्याने येणाऱ्या ऑक्सिजनमध्ये मिसळला जातो. त्यामुळे एकंदर मानवी शरीरास कृत्रिम ऑक्सिजनमधून एकूण क्षमतेच्या 30 टक्केच ऑक्सिजन मिळतो. परिणामी ऑक्सिजनची मागणी अधिक वाढते.


Third COVID-19 Wave | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकारची तयारी सुरु, ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण होण्याचं लक्ष्य


नॉन रिब्रिथिंग मास्कमध्ये व्हॉल्व असणाऱ्या मास्कसोबत रिझरव्हायर बॅग जोडली आहे. यामुळे कृत्रिम ऑक्सिजनचा साठा बॅगमध्ये होऊन यातून रूग्णास 80 टक्यांहून अधिकचा ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. यामध्ये रूग्णांने श्वास घेतल्यानंतर उच्छावासावाटे बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड व्हॉल्वच्या माध्यमातून बाहेर पडतो. त्यामुळे शुध्द आणि क्षमतेएवढाच ऑक्सिजन रिझरव्हायर बॅगमधून रूग्णास मिळतो. संबधित रिझरव्हायर बॅगमुळे ऑक्सिजनची साठवणूक होऊन यातून ऑक्सिजनची बचतही होण्यास सुरूवात होते. 


रिझरव्हायर बॅगमुळे रूग्णांना जास्तीचा कृत्रिम ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे रूग्णांची श्वसनक्रिया लवकर व्यवस्थित होण्यास मदत होते. या बॅगेमुळे रूग्णांचा रुग्णांची रिकव्हरी देखील लवकर होण्यास मदत होते आहे. डॉ. गिराम यांच्या या मास्कचा वापर राज्यात इतरत्र केल्यास यामुळे ऑक्सिजनची मोठी बचत होणार आहे. सध्या पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील 40 रुग्ण रुग्ण अशा पद्धतीच्या मास्कचा वापर करतात. यामास्कमुळे श्वसनास सोपे जात असल्याचे रुग्णांनी सांगितले. मात्र, हा मास्क खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची बचत करीत असला तरी याचा वापर करताना ऑक्सिजनचा पुरवठा अखंडित होणे गरजेचे असल्याचे डॉ. नीरज दोडके यांचे म्हणणे आहे.