रत्नागिरी : कोरोनामुळे राज्यातील लॉकडाऊन वाढवला गेला आहे. सध्या कोकणात येण्यासाठीही बंधनं असून निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी ई-पास बंधनकारक असून जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी केली जात आहे. परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची अँटिजेन चाचणी देखील केली जात आहे. परिणामी जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची, प्रवाशांची संख्याही कमालीची कमी झाली आहे. शिवाय, कोकणात प्रवेश केल्यानंतर हातावर क्वॉरन्टीनचा शिक्का मारत 14 दिवसांचा क्वॉरन्टीन कालावधी निश्चित करण्यात आला आहे. परिणामी आता कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील कमालीची घटली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या चार अर्थात अप आणि डाऊन मार्गावरील चार ट्रेन्स तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहे. 


रद्द केलेल्या गाड्यांमध्ये गाडी क्रमांक 02414 एच निजामुद्दीन-मडगाव जंक्शन राजधानी सुपरफास्ट ही साप्ताहिक गाडी 30 एप्रिलपासून रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 02413 एच मडगाव जंक्शन-निजामुद्दीन सुपरफास्ट 2 मेपासून रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 02120 करमाळी-मुंबई सीएसएमटी तेजस सुपरफास्ट 28 एप्रिलपासूनच रद्द केली आहे. गाडी क्रमांक 02119 मुंबई सीएसएमटी-करमाळी तेजस सुपर फास्ट एक्सप्रेस, तसंच गाडी क्रमांक 02620 मंगळूर-लोकमान्य टिळक टर्मिनस डेली सुपरफास्ट स्पेशल गाडी, गाडी क्रमांक 07107 मडगाव जंक्शन-मंगळूर सेंट्रल आरक्षित गाडी एक्सप्रेस विशेष गाडी आणि गाडी क्रमांक 07108 मंगळूर- मडगाव जंक्शन राखीव विशेष गाडी 29 एप्रिलपासून रद्द करण्यात आली आहे. तसेच 02619 लोकमान्य टिळक टर्मिटस-मंगळूर सेंट्रल डेली सुपरफास्ट गाडी 30 एप्रिलपासून रद्द करण्यात आली आहे. 


चाकरमान्यांना यंदा गाव दूरच
 उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होत असतात. यावेळी असलेली ट्रेनची संख्या किंवा आरक्षित सीट्स देखील कमी पडतात. पण, यंदा कोरोनाचं सलग दुसरं वर्ष असून चाकरमान्यांना आपल्या गावी काही नियमांमुळे येता येणार नाही. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. साधारण एप्रिलपासूनच कोकणात चाकरमानी दाखल होतात. पण, यंदा मुंबईतील सारी परिस्थिती पाहता ही संख्या लक्षणीय रित्या कमी झाली आहे. ज्या गाड्या फुल्ल होऊन धावत असत त्यामधून प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या काही ट्रेन्स तात्पुरत्या रद्द करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.