दहावी आणि बारावी हे शालेय आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे आहेत. दहावी किंवा बारावी परीक्षेत अपयश आलं तर काही विद्यार्थी खचून जातात, त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. तर काही जण मृत्यूलाही कवटाळतात. त्यामुळे दहावी, बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहता यावं, यासाठी त्यांना रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एमएचटी सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, पीसीएम-पीसीबी ग्रुपच्या स्वतंत्र परीक्षा
राज्य सरकारने अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करण्यासाठी 'कौशल्य सेतू कार्यक्रम' योजना राबवण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार दहावी आणि बारावी परीक्षेत तीन किंवा अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाल्यास, विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर 'अनुत्तीर्ण' शेरा न देता 'कौशल्य विकासास पात्र' असा शेरा दिला जाणार आहे.
याआधी शिक्षण विभागाने 27 सप्टेंबर 2018 रोजी शासन निर्णय जारी करुन दहावी परीक्षेत तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 'कौशल्य विकासास पात्र' असा शेरा देण्याचं नमूद केलं आहे. यानंतर दहावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर 'एटीकेटी' असा शेरा येत होता.