मुंबई : राज्य प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार इंजिनीअरिंग आणि फार्समी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षा 13 ते 23 एप्रिल 2020 दरम्यान होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षांच्या तारखांची पूर्वकल्पना येऊन परीक्षेची तयारी करता यावी यासाठी सीईटी सेलकडून उच्च शिक्षणाच्या 8 व्यवसायिक आणि तंत्र शिक्षणाच्या 6 अभ्यासक्रमांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.


यावर्षीही पर्सेन्टाईल पद्धतीने निकाल घोषित करण्यात येणार असून त्यासाठी परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार आहेत. सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. या सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. सीईटी सेलद्वारे तीन व पाच वर्षीय विधी (लॉ), बीई/बीटेक, फार्मसी, एमबीए, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, बीपीएड, एमपीएड, बीए/ बीएस्सी बीएड इंटिग्रेटेड कोर्स या सर्व अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठीचे वेळापत्रक जाहीर केलं आहे.


या विविध सीईटींसाठी कोणत्या तारखेला अर्ज करायचे याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यानी केवळ अधिकृत संकेतस्थळावरील वेळापत्रकावरच विश्वास ठेवावा, असं आवाहन सीईटी सेल आयुक्त संदीप कदम यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.


मागील वर्षी पीसीएम, पीसीबी , पीसीएमबी अशा गटांत परीक्षा घेताना आणि पर्सेन्टाइल पद्धतीने निकाल घोषित करताना बराच गोंधळ उडाला होता. त्यामुळे यंदा पीसीएमबी गट रद्द करण्यात आला असून केवळ पीसीएम, पीसीबी गटाच्या स्वतंत्र परीक्षा घेण्यात येणार आहेत. पीसीएम आणि पीसीबी गटाच्या परीक्षा 13 ते 17 एप्रिल आणि 20 ते 23 एप्रिल दरम्यानच्या काळात होतील असे सेलकडून सांगण्यात आले आहे.