मुंबई : महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलात छोटा बदल करण्यात आला आहे. या बदलानंतर एक अधिकचं कॅबिनेट मंत्रीपद आता राष्ट्रवादीला मिळणार आहे. आधी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार, शिवसेनेला 15 मंत्रीपदं, राष्ट्रवादी काँग्रेसला 15 मंत्रिपदं आणि काँग्रेसला 12 मंत्रीपदं मिळणार होती. यामध्ये शिवसेनाला 15 मंत्री अधिक मुख्यमंत्री म्हणजे 16 एकूण मंत्रिपद होती. मात्र नवीन फॉर्मुल्यानुसार एक वाढीव मंत्रीपद आता राष्ट्रवादीच्या पदरी पडलं आहे. याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आला नाही. हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार व्हावा, असा विचार सुरु आहे.


आता नवीन फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला 15 मंत्रिपदं मिळणार आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्रीपद आणि 11 कॅबिनेटसह चार राज्यमंत्रीपदं मिळणार आहेत. राष्ट्रवादीला 16 मंत्रीपदं मिळणार आहेत. यामध्ये 12 कॅबिनेट आणि चार राज्यमंत्रीपदांचा समावेश आहे. यामध्ये उपमुख्यमंत्रीपदही आहे. तर काँग्रेसला 13 मंत्रीपदं मिळणार आहेत. यामध्ये 9 कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्रीपदांचा समावेश आहे. काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपदही देण्यात आलं आहे.


महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहा मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे. या सहा मंत्र्यांमध्ये शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन, काँग्रेसच्या दोन मंत्र्यांचा समावेश आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनी शपथ घेतली आहे. काँग्रेसकडून नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरात यांनी शपथ घेतली आहे. तर राष्ट्रवादीकडून जंयत पाटील आणि छगन भुजबळ यांनी शपथ घेतली आहे. तर काँग्रेसच्या नाना पटोले यांची बिनविरोध विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.