मुंबई : एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार का? राजकीय वर्तुळात रंगलेल्या या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून शुक्रवारी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते. एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घटना आहे. एकनाथ खडसे यांच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.


एकनाथ खडसे यांनी गेल्या 40 वर्षांपासून भाजप पक्षासाठी मोठं काम केलं आहे. एकनाथ खडसे हे गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मानले जातात, परंतु मुंडे यांच्या निधनानंतर कालांतराने एकनाथ खडसेंना भाजपात डावलंलं जात होतं. एकनाथ खडसे यांनी राज्याच्या विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद भूषवले होते. तसेच फडणवीस सरकारमध्ये त्यांनी महसूलमंत्री म्हणून काम पाहिलं होतं.


एकनाथ खडसे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 1987 मध्ये झाली होती. खडसे कोथळी गावचे सरपंच म्हणून निवडून आले होते. जेव्हा पहिल्यांदा ते कोथळी ग्रामपंचायतीमध्ये सभासद पदासाठी उभे राहिले तेव्हा त्यांचा पराभव झाला होता. नंतर दुसऱ्या वेळी ते निवडून आले. 1989-1990 विधानसभा निवडणुकीत एदलाबाद विधानसभा मतदारसंघातून, आताचा मुक्ताईनगर मतदार संघातून ते विजय झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत खडसेंची सलग सहा वेळा मुक्ताईनगरमधून विधानसभेसाठी निवड झाली. 2009 मध्ये एकनाथ खडसेंची महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. 2014मध्ये भारताच्या राजकारणात आलेल्या मोदींच्या लाटेवर भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती. त्यावेळी एकनाथ खडसे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होतं. परंतु, देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदावर निवड झाली. फडणवीस सरकारमध्ये खडसे यांच्यावर महसूल मंत्री, कृषी मंत्री, राज्य उत्पादनशुल्क मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. 2014 ते 2016 या काळात एकनाथ खडसे 12 खात्यांचे मंत्री होते.


पाहा व्हिडीओ : एकनाथ खडसेंचा भाजपला धक्का, खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार : जयंत पाटील



2016 मध्ये एकनाथ खडसेंवर भ्रष्टाचाराचे झाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून खडसेंना उमेदवारी नाकारण्यात आली. तसेच आमदारकीसाठी त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांना भाजपने तिकीट दिले. मात्र रोहिणी खडसे यांचा या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणि गिरीश महाजन यांच्यावर आपली राजकीय कारकीर्द संपवण्याचा कट रचला गेला, असे आरोप केले होते. मे, 2020 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणूकींसाठीही खडसे उत्सुक होते. परंतु, त्यावेळीही खडसेंना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली नाही.


खडसेंच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे :


1988 - कोथळी गावचे सरपंच झाले.
1990 - मुक्ताईनगर चे आमदार बनले
1997 - भारतीय जनता पक्ष-शिवसेना सरकारमध्ये पाटबंधारे मंत्री बनले.
2010 - विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली.
2014 - भा.ज.प. सरकारमध्ये महासूल मंत्री, कृषी मंत्री, अल्पसंख्याक मंत्री, उत्पादन शुल्क मंत्री बनले.
2016 - महसूल मंत्रिपदावरून राजीनामा दिला.


महत्त्वाच्या बातम्या :