औरंगाबाद : 40 वर्ष पक्षात राहिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपला मोठा धक्का दिला. एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम केला असून 23 ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मंत्री राजीनामा देणार असल्याची चर्चा रंगली आहे.
एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष सोडला असल्याची माहिती मला मिळाली आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येताना खडसे यांनी कोणतीही अट ठेवली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्त्वात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली," असंही पाटील यांनी नमूद केलं.
परंतु राष्ट्रवादी प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांची लगेचच मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, "राष्ट्रवादीचा एक मंत्री राजीनामा देईल, त्या जागी एकनाथ खडसे मंत्री होती. तर जो मंत्री राजीनामा देईल तो प्रदेशाध्यक्ष होईल. दिलीप वळसे-पाटील किंवा जितेंद्र आव्हाड यांच्यापैकी एखादा मंत्री राजीनामा देणार असल्याची प्राथमिक शक्यता आहे."
मी फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज, त्यांच्यामुळेच पक्ष सोडतोय : एकनाथ खडसे
"मी फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहे. त्यांच्यामुळेच मी पक्ष सोडत आहे," अशी पहिली प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. "विनयभंगाचा खटला दाखल करणं हे सर्वात वेदनादायी होतं. देवेंद्र फडणवीसांकडून जीवन उद्ध्वस्त करण्याचा झाला," असा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला. "राजीनामा दिल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याशिवाय कोणीही फोन केला नाही. माझ्यासोबत कोणीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार नाहीत. रक्षा खडसे देखील पक्ष सोडणार नाहीत," असंही खडसे यांनी सांगितलं.
समर्थकांकडून जल्लोष
दरम्यान भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर एकनाथ खडसे यांच्या जळगावातील निवासस्थानाबाहेर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.
एकनाथ खडसे यांची कारकीर्द
*2 सप्टेंबर 1952 रोजी एकनाथ खडसेंचा मुक्ताईनगर तालुक्यातील कोठाळी गावात जन्म झाला.
*खडसेंचे वडील शेतकरी होते. प्राथमिक शिक्षण कोठाळी गावातील शाळेतच झालं.
*खडसेंना सामाजिक कार्याची आवड असल्याने तरुणपणीच राजकारणात सक्रीय होते.
*एकनाथ खडसे 1987 मध्ये खडसे कोठाळी गावचे सरपंच म्हणून निवडून आले. तिथूनच्या त्यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा झाला
*1989 मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले.
*खडसेची सलग सहा वेळा मुक्ताईनगरमधून विधानसभेसाठी निवड झाली.
*1995 मध्ये युती सरकार आल्यानंतर खडसेंनी अर्थ आणि जलसंपदा मंत्री म्हणून काम केलं.
*2010 साली विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून एकनाथ खडसेंची निवड झाली.
*तर 2014 ची विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर खडसेंना मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते.
*ज्युनिअर असलेल्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने खडसे नाराज होते, मात्र त्यांची महसूलमंत्रीपदी वर्णी लागली.
*एकनाथ खडसे यांची सून रक्षा या जळगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून संसदेत.
*खडसे महसूलमंत्री झाल्यानंतर त्यांच्या पत्नी मंदाकिनी या महानंद डेअरीच्या संचालक झाल्या.
*तसंच मुलगी रोहिणी खडसे जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत.
भाजप नेत्यांची प्रतिक्रिया
खडसेंचा पक्षांतराचा निर्णय दुर्दैवी : रावसाहेब दानवे
एकनाथ खडसे यांचा पक्षांतराचा निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. "एकनाख खडसेंचा निर्णय पक्षापेक्षा त्यांच्यासाठी दुर्दैवी आहे. नाथाभाऊंनी भाजप सोडायला नको होता. खडसेंची समजूत काढण्यात पक्ष कुठेही कमी पडलेला नाही. दिल्या घरी सुखी राहा," असंही रावसाहेब दानवे म्हणाले.
ओ जानेवाले हो सके तो लौट के आना : सुधीर मुनगंटीवार
एकनाथ खडसे यांनी भाजप पक्षाचा राजीनामा देणं ही चिंतनाची बाब असल्याची प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यावेळी त्यांनी काहीशा काव्यात्मक शैलीत आपल्या भावना व्यक्त केल्या. 'ओ जानेवाले हो सके तो लौट के आना', 'सदा खूश रहो ये दुआ है हमारी' अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं.
अधिकृत माहिती मिळालेली नाही : देवेंद्र फडणवीस
अधिकृत माहिती मिळालेली नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष याबाबत निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली.
एकनाथ खडसेंचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांना मिळाला : केशव उपाध्ये
एकनाथ खडसे यांचा राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्षांना मिळाला आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, असं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितलं. नाथाभाऊ जाऊ नये यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न केले. संवादातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. खडसेंवर अन्याय झाला की नाही हा विषय व्यक्तिसापेक्ष आहे, असंही ते म्हणाले.
संंबंधित बातम्या