मुंबई : परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. अशात आता मुख्यमंत्र्यांसह राज्यातील काही नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पिक डोळ्यादेखत वाहून गेलं, घरं पडली, काही लोकांचे बळी गेले, जनावरं दगावली अन् शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. मदत मात्र शून्य. शेजारच्या तेलंगणामध्येही विशेषत: हैदराबादमध्ये पावसाने मोठा हाहा:कार माजवला होता. मात्र तिथल्या सरकारनं लोकांना तात्काळ दिलासा देत मदत केली.  तेलंगणा सरकारसोबत बाहेरील राज्यांकडूनही मदतीची घोषणा केली. तसेच तिथल्या कलाकारांनी देखील मदतीचा हात दिला. महाराष्ट्रात मात्र केवळ सोशल मीडियात दौऱ्यांचे फोटो, पोकळ संवेदनाच दिल्या जात असल्याचं चित्र आहे. ना सरकारनं कुठली मदत केली, ना बाहेरील राज्यांनी कुठली मदत केली, ना अजून कुठले कलाकार या बळीराजाच्या मदतीला आलेत.


तेलंगणात सरकारनं काय केलं
तेलंगणामध्ये गेल्या एका आठवड्यात राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे 70 लोकांचा मृत्यू झाला. त्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार, मंगळवारपासून हैदराबाद शहरातील चार लाख कुटुंबाच्या घरी जावून प्रती कुटुंब दहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे.   शहरातील आमदार आणि एमएलसी, मंत्री यांच्यावर मदत वाटपांवर देखरेखीसाठी आणि पुढच्या दहा दिवस लोकांसमवेत राहण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.  तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सोमवारी शहरातील पूरग्रस्तांना तातडीने मदत म्हणून 10 हजार रुपये मदत देण्याचे तसेच नुकसान झालेल्या घरांना प्रत्येकी एक लाख रुपये आणि अर्धवट नुकसान झालेल्या घरांना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली. तांदूळ आणि डाळींसारख्या जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मदत केली.  शेतकऱ्यांनाही सरकार मदती करणार आहे. सर्व बाधित रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांचं नुकसान झालेलं आहे तिथं युद्धपातळीवर दुरुस्त करून पूर्ववत करण्याचे काम सुरु आहे.


तेलंगणाला अशीही मदत
तेलंगणाला दिल्लीकडून मदत मिळाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद  केजरीवाल यांनी 15 कोटी रूपयांची मदत केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्री मदत निधीसाठी दोन कोटी रुपयांचे योगदान दिले तसेच आणखी मदतीचं आश्वासन दिलं आहे.  सिकंदराबादचे खासदार आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी मदत कार्यासाठी तीन महिन्यांच्या पगाराची घोषणा केली. हैदराबाद शहरातील आमदार, खासदार तसेच मंत्री यांचा तीन महिन्याचा पगार दिला आहे. सोबतच सुपरस्टार चिरंजीवी, महेश बाबू आणि इतर तेलुगू चित्रपटातील अनेक कलाकारांनी मुख्यमंत्री मदत निधीला पूरमुक्तीसाठी योगदान देण्याची घोषणा केली आहे.


महाराष्ट्र मदतीला धावला पण महाराष्ट्राच्या मदतीला कुणीच नाही
तेलंगणाप्रमाणंच महाराष्ट्रात देखील मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांचं उभं पिक वाहून गेलं. बळीराजा पुरता बुडालाय. अशी भयंकर स्थिती असताना मह्राराष्ट्रातील नेत्यांकडून सध्या दौऱ्याचे फार्स सुरु आहेत. मात्र अद्याप काहीही मदत किंवा दिलासा मात्र बळीराजाला मिळालेला नाही. केरळ किंवा बाहेरील राज्यांवर संकट आलं त्यावेळी महाराष्ट्रानं नेहमी मदत केली आहे. मात्र महाराष्ट्राला अजून कुठल्याही राज्याकडून काहीही मदत आलेली नाही. सोनिया गांधींनी मागे बोलवलेल्या बिगर भाजप राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तर ममता बॅनर्जींनी उद्धव ठाकरेंच्या लढवय्येपणाचं कौतुक देखील केलं. पण त्यांनी मदत मात्र आधी तेलंगणाला केली. इतर कुठल्याही राज्यानं अजून तरी महाराष्ट्राला मदत केलेली नाही.


आरोपांच्या फैरी, दौऱ्यांचा फार्स
राज्यात आभाळ फाटलं आणि शेतकरी राजाचं प्रचंड नुकसान झालं. पाऊस थांबल्यानंतर राज्यातील नेत्यांचे दौरे सुरु झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री आणि आमदार तसेच नेतेमंडळी शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेत आहेत. त्यांना उभारी देण्याची भाषा करत आहेत. मात्र मदतीबाबत कुठलीही घोषणा मात्र आज आठवडा उलटून गेला तरी झालेली नाही. राज्य सरकार केंद्राकडून अपेक्षा करतंय तर विरोधक राज्यसरकारवर आरोप लावतंय. यात शेतकरी आणि पूरग्रस्त मदतीपासून वंचितच आहे.


नेतेमंडळी मदत कधी करणार?
नेतेमंडळी या अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी जागोजागी भलेमोठे फ्लेक्स आणि होर्डिंग्स लावत आहेत. दौऱ्याच्या माहितीचे आकर्षक पोस्टर सोशल माध्यमात फिरवले जात आहेत. एकंदरीत बळीराजाचं दु:ख पाहण्याचा हा इव्हेंटच साजरा केला जातोय. निवडणुकीच्या वेळी या नेत्यांच्या संपत्तीचं विवरण आपल्यासमोर येतं. त्यावेळी यांची अब्जावधीच्या संपत्तीचे आकडे समोर येतात तेव्हा आपण अवाक् होतो. या संपत्तीतून एकाही रुपयाची मदत कुठल्या नेत्याने केलेली नाही. किंवा आपल्या राज्यातल्या एकाही आमदाराने किंवा खासदाराने अजून त्याचं वेतन अतिवृष्टीग्रस्तांना देण्याविषयी काहीच भूमिका घेतलेली नाही.


कलाकार कुठे गेले?
बॉलिवूड महाराष्ट्रात म्हणजे मुंबईत आहे. या कर्मभूमीत अनेक कलाकार मोठे झाले. अर्थात ते त्यांच्या कष्टाने मोठे झाले, हे खरंय. मात्र कर्मभूमी संकटात असताना अनेकदा कलाकारांनी सढळ हाताने यापूर्वी मदत केलेली आहे. आता एवढं मोठं संकट आलं तरी कलाकारांकडून मदतीबाबत काहीही घोषणा नाही. तेलंगणामध्ये सुपरस्टार चिरंजीवी, महेश बाबू आणि इतर तेलुगू चित्रपटातील अनेक कलाकारांनी मुख्यमंत्री मदत निधीला या संकटातून सावरण्यासाठी योगदान देण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रासाठी मात्र अद्याप तरी कुठल्याही हिंदी किंवा मराठी कलाकारांनी मदत केल्याचं ऐकिवात नाही.



संबंधित बातम्या


येत्या दोन दिवसात मदतीचा निर्णय जाहीर करु : मुख्यमंत्री


परतीच्या पावसाचं संकट टळलेलं नाही, घाईगडबडीने निर्णय घेणार नाही : मुख्यमंत्री


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थिल्लरबाजी करु नये, देवेंद्र फडणवीसांची टीका


ठाकरे सरकार हे रडणारे सरकार आहे, ते काय अश्रू पुसणार? : प्रवीण दरेकर


नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट मदत करणे गरजेचे: देवेंद्र फडणवीस