अमरावती : राज्यात मिश्र खतांमध्ये राज्यात मिश्र खतांमध्ये राख मिसळली जात असल्याचा गंभीर आरोप कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे. बियाणं जर उगवलं नाही तर शेतकऱ्याचं वर्ष वाया जाते. त्यामुळे हा विषय खूप गांभीर्याने घेतला आहे, असेही डॉ. अनिल बोंडे यांनी यावेळी सांगितलं.

या बोगस खतांच्या विक्रीविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितलं आहे. आता यापुढे ज्या जिल्ह्यात असा प्रकार आढळेल त्या जिल्ह्यात दुसऱ्या जिल्ह्याचं पथक धाड टाकेल, असेही त्यांनी सांगितले.

असे प्रकार आढळून आल्यास शेतकऱ्यांनी थेट माझ्या नंबरवर माहिती द्यावी. ती माहिती गुप्त ठेवून तातडीने भरारी पथक पाठवून छापा मारण्यात येईल, असेही कृषी मंत्री बोंडे यावेळी म्हणाले.

एकीकडे खरीप हंगाम तोंडावर आला आहे आणि दुसरीकडे बोगस बियाणे विकणाऱ्यांचा मार्केटमध्ये सुळसुळाट झालाय. राज्यात ह्यावर कारवाई करण्यासाठी भरारी पथके तैनात केली आहेत. नुकतीच ह्या पथकांनी करोडोची बोगस बियाणे वेगवेगळ्या धाडीत जप्त केली आहेत. ह्यातील जास्तीत जास्त बोगस बियाणे मराठवाडा आणि विदर्भातील आहेत.

एकट्या विदर्भात नागपूर विभागात एक कोटींच्यावर तर अमरावती विभागात 1.78 लाखांची बोगस बियाणे ह्या हंगामाच्या तयारीदरम्यान पकडली गेली आहेत. बोगस बियाण्यांच्या विक्रीचं थेट कनेक्शन आंध्र प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशात आहे.

हा सर्व व्यवसाय जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातून चालत असल्याचं काही धाडीतून सिद्ध झालं आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना कमी किमतीत बोगस बियाणे देऊन दामदुप्पट पैसे उकळणाऱ्या टोळ्या महाराष्ट्रात दाखल झाल्या आहेत. जिल्ह्याच्या सीमावर्ती गावांतील शेतकऱ्यांना लक्ष्य करून आकर्षक रंगाच्या पॅकेजमधील माल शेतकऱ्यांना पुरवला जातो आहे.

ह्या बोगस बियाणांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच अपुरी आहे. कृषी विभागाकडून भरारी पथक स्थापन केली आहेत. मात्र, त्यातही कर्मचाऱ्यांची मर्यादा असते. तपासासाठी वाहनं नाहीत. कृषी केंद्राच्या संचालकांना मिळणाऱ्या कमिशनमुळे धाडी टाकूनही त्यामागचे मास्टरमाईंड सापडत नाहीत. त्यामुळं दरवर्षी बोगस बियाण्यांची खरेदी करून शेतकऱ्यांना फसवले जात आहे.

हे बियाणे जर पेरण्यात आले असते तर याचा पेरा हा चार हजार हेक्टरहून अधिक राहिला असता. ह्यातील जास्तीत जास्त बियाणे कापूस पिकाची होती. ज्या पद्धतीने ही बोगस बियाणे विकणारी आंतरराज्य टोळी कार्यरत आहे, ते बघता पकडलं गेलेलं तेवढंच बोगस बियाणे आहे, असे मुळीच म्हणता येणार नाही. उलट यापेक्षा कितीतरी पटीने बोगस बियाणे ह्या हंगामात शेतकऱ्यांजवळ पोहचेल, अशी शक्यता आहे.  यंत्रणा कमी असल्यामुळे ह्या जाळ्यातून जर वाचायचे असेल तर शेतकऱ्यानेच आपण कुठले बियाणे घेत आहोत ह्याबद्दल सतर्क राहणे गरजेचे आहे.