पुणे : पुण्यात सोसायटीची भिंत कोसळून झालेल्या घटनेची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पावसामुळे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून पुण्यातील कोंढवा येथे झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देत मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख आणि जखमींना 25 हजार रुपयांची मदतही जाहीर केली आहे. याआधी सकाळी या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाखांची मदत राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जाहीर केली आहे. एनडीआरएफच्या (नैसर्गिक आणि आपत्ती व्यवस्थापन) कोट्यातून ही मदत दिली जाणार आहे. मात्र या दुर्घटनेतील मृतांपैकी अनेकजण एकाच कुटुंबातील आहेत, मग ही मदत देणार कुणाला हा प्रश्नही उपस्थित झाला आहे.


या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करतानाच मुख्यमंत्र्यांनी मृतांना कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, बांधकाम मजूर रहात असलेल्या कच्च्या झोपडीवर रात्री दीडच्या सुमारास संरक्षक भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना मी श्रद्धांजली वाहतो आणि जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मृतकांमधील 12 मृतक हे बिहारच्या एकाच गावातील आहेत. हे मृतदेह त्यांच्या गावी पोहोचविण्याची व्यवस्था सरकारकडून केली जाणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


इमारतीच्या कपाऊंडची भिंत बांधतांना बांधकाम व्यावसायिकाने निष्काळजीपणा केला असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. पुण्यातील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत संवेदनाही व्यक्त केल्या आहेत.

पुण्यातील कोंढवा भागात आल्कन स्टायलस या सोसायटीची भिंत कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु असून तिघांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. अद्यापही ढिगाऱ्याखाली काही लोक असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, कम्पाऊंड भिंत कोसळलेल्या आल्कन स्टायलस सोसायटीच्या दोन बिल्डरांना पोलिसांनी चौकशी करुन, दोन्ही बिल्डर, कंत्राटदार आणि सुपरवायझर अशा एकूण आठ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

पाहा काय म्हणाले जिल्हाधिकारी




संबंधित बातम्या