रत्नागिरी : तिवरे येथील धरण दोन जुलैच्या रात्री फुटले अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. यात अनेक संसार वाहून गेले यातून सावरत असतानाच तिवरेवासियांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. धरण फुटीमुळे पिण्याच्या पाण्याची झळ ग्रामस्थांना आत्तापासूनच बसू लागली आहे. कारण, धरण फुटल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले. परिणामी या धरणातून वाहणारा पाण्याचा प्रवाहही बंद झालाय. त्यामुळे आधी पाण्याने सर्व काही वाहून नेलं आणि आता त्यासाठीच वनवन भटकण्याची वेळ तिवरे गावच्या नागरिकांवर आली आहे.


तिवरे धरण फुटल्याने प्रवाहावर वाहणाऱ्या नद्या कोरड्या पडल्यात. हे पाणी जवळपास दहा ते पंधरा गावांची तहान भागवत होते. त्या प्रवाहातून धरण परीसरांत आजुबाजुच्या छोट्याछोट्या गावातील नदी पात्रात ओलावा असायचा. वाडीवस्तीतील लोकांनी प्रवाहाच्या बाजुला विहरी पाडल्या आणि त्या विहरींना बारमाही पाणी होते. या पाण्यावरच गावातील गावकरी पोटाची भुक भागविण्यासाठी भात शेती, भाजीपाला, फुल लागवड करत गुजराण करत. त्यातून त्यांना रोजगार मिळायचा. पण नियतीच्या खेळाने हे सर्व दुर केले आणि जिथे ओलावा होता तीथे कोरडा दुष्काळ झाला.
धरण फुटल्याने विहिरीही कोरड्या -
धरण फुटून सहा महिने ओलांडले नाही तोच पाण्याची झळ बसू गावकरांना बसू लागली आहे. धरण फुटल्याने नद्या कोरड्या झाल्या, परीणाम पाण्याची पातळी खाली गेल्याने परीसरातील नदी नाला, विहरी, बोरवेल कोरड्या पडल्या असून गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या जाणवू लागली आहे. सध्या गावकरी पाण्याची इकडून तिकडून सोय करत आहे.

धरण फुटून उद्ध्वस्त झालेलं तिवरे गाव सिद्धिविनायक मंदिर न्यास दत्तक घेणार

हंडाभर पाण्यासाठी पायपिट -
गावकरी डोंगराच्या कपारीतून थिबकणारे पाणी डबक्यात साचल्यावर एक एक हंडा कळशी आळीपाळीने भरत त्याच्यावर दिवस काढत आहेत. या डबक्यात तासंतास पाणी साचण्याची वाट पाहावी लागते. तर काही ठिकाणी गावातील वाडीच्या नळपाणी योजनेच्या विहिरी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याने सध्या नळपाणी योजना बंद अवस्थेत आहेत. अशा परीस्थितीत आम्ही करायचे काय? असा प्रश्न गावकरी विचारत आहेत. प्रशासनाला वारंवार सांगूनही प्रशासनाने ठोस पावले उचलेली नाहीत. चार दिवसांतुन एखादा टँकर पाठवला जातो. या एका टँकरवरती जवळपास तीन हजार लोकसंख्या कशी काय आपली तहान भागवू शकते? हे देव जाणे. पाण्याच्या समस्येमुळे काही ग्रामस्थ गाव सोडून मुंबईकडे जाण्याच्या मार्गावर आहेत.

VIDEO | तिवरे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा