पंढरपूर : वर्षानुवर्षांची आपली विचारधारा, तत्वं बाजूला सारून सत्तेसाठी राज्यात अभद्र युती झाली असून हे तीन पायांची शर्यत महाराष्ट्राला एका दिशेला नेईल असं वाटत नाही, असा आरोप भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. सांगोला तालुक्यातील एका कार्यक्रमाला जाताना खडसे विठ्ठल दर्शनासाठी थांबले असताना ते बोलत होते. काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षांनी वर्षानुवर्षे जपलेली तत्वं यावेळी सत्तेसाठी सोडून दिली असून पहिल्या 50 दिवसात 50 प्रकाराने समोर आली आहेत. एकमेकांवर आरोप, विसंगत विधाने यातून ही तीन पायाची शर्यत सुरु असून सत्तेसाठी एकत्र आलेली ही अभद्र युती किती दिवस चालेल असं सांगता येत नाही असा टोला खडसे यांनी लगावला. शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पुरोगामी पक्ष आहेत. पण आता जनतेसमोर जाताना हे कोणती विचारधारा घेऊन जाणार असा सवालही खडसे यांनी केला.


तान्हाजी चित्रपटावरून उठलेल्या वादावर बोलताना खडसे म्हणाले की, शिवाजी महाराजांची तुलना जगात कोणासोबतही होऊ शकत नसली तरी त्यांच्या विचारधारेचे अवलोकन करणे यात गैर काय? असा सवाल केला. त्यांनी मोदी आणि अमित शाह यांचे चेहरे लावलेल्या प्रकरणाचं अप्रत्यक्ष समर्थन केलं.

शिवसेना ही 2014 साली काँग्रेससोबत सरकार स्थापन करायच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याने उठलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना खडसे म्हणाले की, त्यांच्या आरोपात तथ्य असू शकते असे खडसे यांनी सांगितले. 2014 साली शिवसेना- भाजप वेगळे लढले होते त्यामुळे शिवसेनेने कुणासोबत जायचे हा त्यांचा निर्णय होता. ज्याप्रमाणे यावेळी भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी हे तीनही पक्ष एकत्र आले त्याचपद्धतीने 2014 साली प्रयत्न झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असल्याने त्यांची माहितीत नक्कीच तथ्य असू शकेल असे खडसे यांनी सांगितले.

या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपमधील ज्या नेत्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणांच्या विरोधात काम केले त्यांचे पुरावे पक्षश्रेष्ठींना देण्यात आले असून अशा नेत्यांवर लवकरच कारवाई होईल, असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला.

खडसे यांनी यापूर्वीच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काही नेत्यांवर पक्षविरोधी काम केल्याचा आरोप केला होता. आपण पक्षश्रेष्ठींना याबाबत सर्व पुरावे दिले असून आपली भूमिका त्यांच्यासमोर मांडली आहे. हा पक्षांतर्गत मामला असल्याने लवकरच ही कारवाई झालेली दिसेल असे खडसे यांनी सांगितले. अजित पवार यांच्यासोबत केलेले सत्तास्थापनेचा प्रयत्न योग्य नव्हता याचा पुनरुचार खडसे यांनी केला. राज ठाकरे भाजपसोबत येण्याच्या प्रश्नावर बोलताना खडसे यांनी सांगितलं की, अजून असे काहीच झाले नसून आता भाजप एकटं समर्थपणे काम करत आहे असं खडसे यांनी सांगितलं.


संबंधित बातम्या 

जळगाव जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार? नाथाभाऊ किंगमेकरच्या भूमिकेत 

जळगाव जिल्हा परिषदेसाठी भाजपकडून सारं काही आलबेल 

खडसेंकडून चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप, गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण 

निवडणुकीत पक्षविरोधी काम केलेल्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार, एकनाथ खडसेंना जेपी नड्डांचं आश्वासन