Dr. Prakash Ambedkar : इंडिया की भारत वादावर प्रकाश आंबेडकरांची परखड भूमिका, म्हणाले हे तर घटना...
घटनेची प्रिॲम्बल अर्थात प्रस्तावनेमध्ये इंडिया हेच नाव आहे. त्यामुळे ते नाव वगळता येणार नाही. नाव बदलणं हे संविधान बदलण्यासारखे होईल, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
पुणे : इंडिया दॅट इज भारत हे नाव असल्याने आपण इंडिया आणि भारत ही दोन्ही नावे वापरु शकतो. मात्र घटनेची प्रिॲम्बल अर्थात प्रस्तावनेमधे इंडिया हेच नाव आहे. त्यामुळे ते नाव वगळता येणार नाही. कारण संविधानाची प्रस्तावना बदलता येत नाही. हे घटना बदलण्यासारखे होईल, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash ambedkar) यांनी केलं आहे.
भाजपच्या इंडिया विरुद्ध भारत या खेळीत विरोधी पक्षांची इंडिया ही आघाडी अडकली. इंडियातील नेते बुद्धु आहेत. घटना समितीत इंडिया की भारत असा वाद झाल्यानंतर हिंदी की इंग्रजी या मुद्द्यावर मतदान झाले आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्रजीच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतला होता, अशी पार्श्वभूमीही त्यांनी सांगितली आहे.
'उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत अशी विभागणी देशाला घातक'
उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत अशी ही विभागणी आहे. ही विभागणी देशाला घातक आहे. ही विभागणी टाळण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इंडिया हा शब्द निवडला होता. दक्षिणेतील इतिहास बघितला तर अणाणादुराई यांच्या चळवळीतून सनातन धर्माला विरोध होत आला आहे. अणाणादुराई यांनी रावण आमचा नायक आहे अशी मांडणी केली होती. पंडित जवाहरलाल नेहरुंनी मोठ्या प्रयासाने या वादावर पडदा टाकला. त्यासाठी कॉंग्रेसचे तामिळनाडूतील सरकार त्यांनी जाऊ दिले होते, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
शूद्रांना घाबरवू नका- प्रकाश आंबेडकर
सनातन धर्म पुन्हा प्रस्थापित करण्याची मागणी होत असेल तर सनातन धर्मातील अस्पृश्यता आणि जातियता पुन्हा प्रस्थापित करण्याचा हा प्रयत्न आहे का? तसं असेल तर वेगळी परिस्थिती निर्माण होईल, असंही ते म्हणाले आणि शूद्रांना घाबरवू नका, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्यांनी स्वतः सत्तेत असताना का नाही आरक्षण दिलं ?
ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्यांनी स्वतः सत्तेत असताना का नाही आरक्षण दिलं?, असा सवाल त्यांनी मराठा आरक्षणाबाबत उपस्थित केला आहे. मराठा समाजाचे पुढारी एकनाथ शिंदे, शरद पवार या मराठा पुढाऱ्यांनी आता स्वतः तोडगा काढावा असंही त्यांनी म्हटलं आहे. सरकारने आता तोडगा नाही असं सांगितलं, तर मग यांनी पुढे आलं पाहिजे. मराठा समाजातील सर्व पुढाऱ्यांनी तोडगा मांडावा” असं प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केलं.