(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोणतीही पदवी नसताना 'तो' रुग्णांवर करायचा उपचार, कोरोनाच्या उद्रेकास कारणीभूत ठरल्याने अखेर पोलिसात गुन्हा
कोणतीही वैद्यकीय शिक्षणाची पदवी नसताना तालुक्यातील सात ते आठ गावात रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टराविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीमंत हरिश्चंद्र खंडागळे असे या 51 वर्षीय बोगस डॉक्टराचे नाव आहे.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात दररोज कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरानंतर आता ग्रामीण भागात देखील कोरोनाने थैमान घातलाय. बार्शी तालुक्यात देखील कोरोना बाधितांची संख्या मोठी आहे. यामध्येच बार्शीत एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. कोणतीही वैद्यकीय शिक्षणाची पदवी नसताना तालुक्यातील सात ते आठ गावात रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टराविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीमंत हरिश्चंद्र खंडागळे असे या 51 वर्षीय बोगस डॉक्टराचे नाव आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष जोगदंड यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
आरोपी श्रीमंत खंडागळे याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नाहीये. मात्र तरी देखील विविध गावांमध्ये जाऊन गृहभेट देऊन त्यांना इंजेक्शन, सलाईन, अँलोपथिची औषधे देत होता. कोरोना बाधित रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करताना ही माहिती समोर आली आहे. रुग्ण ज्यावेळी गंभीर व्हायचे तेव्हा तो त्यांनी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत होता. त्यामुळे आरोपी श्रीमंत खंडागळे यांने नियमबाह्यकृत्य करुन साथ उद्रेक केल्याची तक्रार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष जोगदंड यांनी दिली. त्यांच्या या तक्रारीवरुन बार्शी शहर पोलिसांत भांदवि 188, 269, 270, 336, 420, 419 आणि साथीचे रोग अधिनियम 1897 च्या कलम 2,3,4, महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियम 1961 च्या कलम 33, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 51 ब, तसेच महाराष्ट्र कोव्हिड 19 विनियमन 2020 च्या कलम 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोगस डॉक्टर श्रीमंत खंडागळे हा स्वत: देखील कोरोना बाधित झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर बार्शीतल्या कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. त्याच्यावरील उपचार पूर्ण होताच योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक अमोल ननवरे यांनी दिली. मात्र इतके दिवस रुग्णांवर बोगस पद्धतीने उपचार करत असताना ही बाब लक्षात कशी आली नाही हा देखील मोठा प्रश्न आहे. तसेच रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणारे औषधे कोणत्याही प्रिस्क्रीप्शन शिवाय कुठून उपलब्ध व्हायची हा देखील तपासाचा विषय आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आणि पोलिस प्रशासन या प्रकरणात कशा पद्धतीने कारवाई करणार हे पाहणं महत्वाचा मुद्दा ठरणार आहे.
दरम्यान बार्शी तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. आज (बुधवारी) प्राप्त अहवालानुसार ग्रामीण भागात आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण हे बार्शी तालुक्यात आहेत. बार्शी तालुक्यात बुधवारी 5 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले असले तरी तालुक्यात आतापर्यंत 519 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 8 जणांचा मृत्यू झाला आहे. 110 रुग्ण हे बरे होऊन परतले आहेत. तर तालुक्यातील 401 रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत.