मुंबई : पुणे जिल्ह्यातील एकविरा देवी मंदिर आणि राजगड किल्ल्यावर पर्यटकांना लवकरच रोप-वेची सुविधा उपलब्ध होणार आहे. कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत या करारावर सह्या करण्यात आल्या. पर्यटन विभागासाठी हा पथदर्शी प्रकल्प ठरणार आहे. पर्यटन विभागानं हा रोपवे बनवण्याचा निर्णय घेतला. पण पुण्यातील चिमुकलीने रोपवे बनवू नका अशी मागणी केली आहे. या चिमुकलीनं थेट पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंना पत्र लिहून ही मागणी केली आहे. तिचं पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


चिमुकलीनं पत्रात लिहिलं आहे की, "माननिय आदित्य दादा यांस पत्रास कारण की, राजगडावर रोपवे बांधू नका. कारण गडावर आणि आजूबाजूला फुलपाखरु, हरण, मोर, ससे यांची घरं असतात. आपण गर्दी केली तर हे सगळे तिथून निघून जातील. त्यांना त्यांच्या घरामधून बाहेर काढू नका प्लीज. मला ट्रेकिंगला गेल्यावर त्यांना लपून पाहायला, फुलपाखरांच्या मागे धावायला आवडतं. आपण त्यांना आपल्या घरी राहू देत नाही. मग त्यांना त्यांच्या घरामधून बाहेर पाठवतो. मी एक छोटी गडप्रेमी आणि ट्रेकर साईषा अभिजीत धुमाळ"




एकविरा मंदिर आणि राजगड किल्ला ही दोन्ही ठिकाणे राज्याची भक्ती आणि शक्तिपीठे आहेत. रोप-वेमुळे भाविक आणि पर्यटकांना या ऐतिहासिक स्थळांवर पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे. यातून पर्यटनाला चालना मिळेल. येत्या वर्षभरात काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं होतं. परंतु, यामुळे पर्यावरणाचीही हानी होणार असल्याचं या चिमुकलीनं आपल्या पत्रातून स्पष्ट केलं आहे. 


दरम्यान, पुण्यातील दुर्गवेड्या चिमुरडीनं हे पत्र महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयाच्या पत्त्यावर धाडलं आहे. सध्या सोशल मीडियावर हे पत्र प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे पर्यावर मंत्री आदित्या ठाकरे या चिमुकलीची आर्त हाक ऐकून रोपवे तयार करण्याचा निर्णय मागे घेणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :