सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनानिमित्त कुडाळ मधील भारत प्रेट्रोल पंपवर 100 रुपयांत 2 लिटर पेट्रोल देण्यात येणार होते. तर भाजपचे सदस्य असल्याचं ओळखपत्र असल्यास ते दाखवल्यास त्यांना 1 लिटर मोफत पेट्रोल देण्यात येईल अशीही घोषणा आमदार वैभव नाईक यांनी केली होती. सकाळी 11 ते दुपारी 1 च्या दरम्यान हे पेट्रोल देण्यात येणार होत. मात्र 11 वाजता आमदार वैभव नाईक भारत पेट्रोल पंप वर आले तेव्हा त्याठिकाणी आधीपासूनच भाजपचे कार्यकर्ते जमा झाले होते. भाजप कार्यकर्ते व आमदार वैभव नाईक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भिडले. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जमावबंदीचं उल्लंघन केलं. याप्रकरणी सेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह सेना भाजपच्या 40 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कुडाळ पोलीस स्थानकात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्याच्या मनाई आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 141, 143, 149, 188,269, 270 या कलमाखाली शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान सिंधुदुर्ग भाजपाने जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट घेत या विषयावर काल चर्चा केली. आमदार वैभव नाईक जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान दिले आहे. पोलिसांनी सत्तेच्या दबावाखाली न येता योग्य पद्धतीने कारवाई करून आमदार वैभव नाईक यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करावेत आणि आपल्या दलातील दबावाखाली आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवावे अशी मागणी सिंधुदुर्ग भाजपाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांकडे केली होती. या शिष्टमंडळात भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, पदाधिकारी गुरुनाथ राऊळ, पप्या तवटे समावेश होता. पण जिल्हाधिकाऱ्याच्या मनाई आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वैभव नाईक यांच्यासह सेना भाजपच्या 40 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वैभव नाईक हे आमदार कमी आणि गावगुंड जास्त शोभतात : रणजित देसाई
सेना भाजपचा राडा सुरू झाला तेव्हा आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ पोलीस निरीक्षक कोरे यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपचे पदाधिकारी रणजित देसाई यांनी केला. त्यामुळे आमदारांवर कारवाई व्हावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक हे आमदार कमी आणि गावगुंड जास्त शोभतात. बाळासाहेबांच्या शिवसेनेची संस्कृती वैभव नाईक यांना माहिती नाही. वैभव नाईक यांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केल्यामुळेच त्यांना चोख प्रतिउत्तर भाजप कार्यकर्त्यांनी दिले, असे भाजप पदाधिकारी रणजित देसाई म्हणाले.