मुंबई : दिवाळी म्हटलं की मिठाई, रोषणाई आणि आतषबाजी आलीच. पण गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने होणारे प्रदूषण आणि तीन वर्ष असलेला कोरोनाचा धोका पाहता दिवाळीत फटाके फोडण्यासंदर्भात देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.
कोणत्या राज्यात काय नियम आहेत ते जाणून घेऊया..
दिल्लीत फटाक्यांवर पूर्ण बंदी
दिल्ली सरकारने राष्ट्रीय राजधानीत फटाके फोडण्यावर पूर्ण बंदी घातली आहे. दिल्लीत पर्यावरपूरक फटाक्यांना मान्यता देण्याची कोणतीही चर्चा किंवा योजना नाही त्यामुळे संपूर्णपणे फटाके फोडण्यावर बंदी कायम राहील अशी माहिती दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. "दिल्लीतील हवेची गुणवत्ता आधीच 'खराब' ते 'अत्यंत खराब' असा श्रेणीमध्ये नोंदवली जाते आहे, त्यामुळे फटाक्यांवर पूर्ण बंदी आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितले.
15 सप्टेंबर रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी फटाक्यांवर बंदी घालण्याची घोषणा केली आणि "जीव वाचवण्यासाठी हे आवश्यक आहे" असं केजरीवाल म्हणाले होते. नंतर, 28 सप्टेंबर रोजी, दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने राष्ट्रीय राजधानीत 1 जानेवारी 2022 पर्यंत फटाके विक्री आणि फोडण्यावर पूर्ण बंदी घालण्याचे आदेश दिले.
हरियाणात NCR मध्ये येणाऱ्या 14 जिल्ह्यांत बंदी
हरियाणा सरकारने राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) अंतर्गत येणाऱ्या त्यांच्या 14 जिल्ह्यांमध्ये तत्काळ प्रभावाने फटाके विक्री आणि वापरावर पूर्ण बंदी लादली आहे. एका सरकारी आदेशानुसार, भिवानी, चरखी दादरी, फरिदाबाद, गुरुग्राम, झज्जर, जिंद, कर्नाल, महेंद्रगड, नूह, पलवल, पानिपत, रेवाडी, रोहतक आणि सोनीपतमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर आणि वापरावर पूर्ण बंदी असेल." हा आदेश राज्यातील सर्व शहरांमध्ये देखील लागू होईल जिथे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सरासरी हवेचा गुणवत्ता निर्देशांक खराब श्रेणीत होता त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातंय.
पश्चिम-बंगालमध्ये ईको-फ्रेंडली फटाके फोडा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन करत दीपावलीच्या निमित्ताने फक्त ईको-फ्रेंडली फटाके फोडण्याचं आवाहन केले. काली पूजा आणि दीपावलीच्या निमित्ताने सर्व प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घालणारा कलकत्ता उच्च न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवत सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, फटाक्यांवर पूर्ण बंदी असू शकत नाही. त्याचा गैरवापर रोखण्यासाठी यंत्रणा बळकट केली पाहिजे.
आसाममध्ये पर्यावरणपूरक फटाक्यांना परवानगी
आसामच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरणपूरक फटाके वगळता सर्व प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. येथे हिरवे फटाकेही ठराविक काळात फोडण्यास सांगितले आहे.दिवाळीच्या दिवशी रात्री 8 ते 10 आणि छठपूजेच्या दिवशी सकाळी 6 ते 8 या वेळेतच परवानगी देण्यात आली आहे. दुसरीकडे, आसाम पोलिसांनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या तेल शुद्धीकरण युनिट आणि कॉर्पोरेशनच्या पंपिंग स्टेशन आणि पाइपलाइनच्या 500 मीटरच्या आत फटाके फोडण्यावर पूर्ण बंदी घातली आहे.
तामिळनाडूत इको-फ्रेंडली फटाक्यांना परवानगी
तमिळनाडू सरकारने स्पष्ट केले आहे की 4 नोव्हेंबर रोजी राज्यात फक्त पर्यावरणपूरक फटाक्यांना परवानगी दिली जाईल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार फटाके फोडण्यासाठी फक्त दोन तासांची वेळ मर्यादा निश्चित केली आहे. ज्यामध्ये दिवाळीच्या दिवशी सकाळी 6 ते 7 आणि संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत फक्त फटाके फोडता येतील, असे पर्यावरण, हवामान बदल आणि वन विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
कर्नाटकात काटेकोर नियमावली
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, पर्यावरपूरक फटाक्यांव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या फटाक्यांची विक्री आणि फटाके फोडण्यास प्रतिबंध आहे. संबंधित विभाग आणि अधिकारी फक्त पर्यावरपूरक फटाके विक्रीस परवानगी देऊ शकतात. 1 ते 10 नोव्हेंबर दरम्यान इको-फ्रेंडली फटाक्यांच्या विक्रीसाठी दुकाने उघडता येतील असं कर्नाटकचे मुख्य सचिव पी रवी कुमार यांच्या आदेश जारी करुन सुचना दिल्या आहेत.
महाराष्ट्रात दीपोत्सवाचं आवाहन
दिपावलीच्या उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. त्यामुळे वायू आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढून लोकांच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. करोना झालेल्या किंवा होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे त्रास होण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडण्याचं टाळून दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा असं आवाहन महाराष्ट्र सरकारने लोकांना केले आहे.