Yavatmal Local News : यांत्रिकीकरणाच्या युगात गाई आणि गुरांचं पालन करणं अनेकांना कठीण झालंय. त्यामुळे अनेकदा जनावरे मोकाट सोडली जातात. अशा वृद्ध ,अपंग गाईंचं संगोपन करण्याचं कार्य नेरचे पवन जैस्वाल मागील 25 वर्षांपासून अविरतपणे करत आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्याशी गाईंचा एवढा लळा लागला आहे की, पवन जैस्वाल यांच्या एका हाकेवर अनेक गायी त्यांच्या मागे धावून येतात.
संत उद्धव बाबा गोरक्षण अंतर्गत ते गोरक्षणाचं कार्य निरंतर उद्धव बाबा गोरक्षण करत आहेत. कधी कत्तलीसाठी जाणाऱ्या गायी पोलीस त्यांच्याकडे अनेकदा आणून सोडतात. काही शेतकरीसुध्दा ज्यांना जनावरं पालन करणं शक्य होत नाही ते त्यांच्या गायी जैस्वाल यांच्याकडे आणून देतात आणि त्यासर्वांचा ते स्वतः काळजी घेऊन सांभाळ करतात.
सुरुवातीला 15 गायींपासून सुरु झालेलं गोरक्षणाचं कार्य आज 400 गायींपर्यंत पोहचलं आहे. या सर्व 400 गायींचा सांभाळ करण्यासाठी त्यांना 10 व्यक्तींची त्यांना मदत होते. गावात जनावरं चरायला घेऊन जाण्याचं कार्य बरेचदा कुणी आत्ताच्या काळात करत नाही, त्यात चारा पाण्याची वेळच्यावेळी व्यवस्था करणं आणि या सर्वात गुंतून राहणं अनेकांना कठीण झालं. त्यामुळे अशाच काही व्यक्ती त्यांच्याकडच्या गाईची विक्री करतात, अशावेळी काही गायी कुठे कत्तलखान्याकडे पाठविल्या जातात. मात्र हे सर्व गोपालक पवन जैस्वाल यांना पटत नाही. गायीची सेवा करणं हे परमेश्वरी कार्य आहे, असं ते म्हणतात. त्यामुळेच आज म्हाताऱ्या, आजारी गाईंचे माहेरघर म्हणजे संत उद्धव बाबा गोरक्षण धाम बनले आहे .
येथे आलेल्या आजारी गायींची विशेष काळजी घेतली जाते. त्या सुदृढ झाल्यावर कळपात एकरूप होतात. येथे दररोज गायींना ढेप खुराक दिली जाते. गायींच्या चाऱ्यासाठी 5 एकरमध्ये चारा पिकांची लागवड केली गेली आहे. तसेच येथे 10 एकरचे शेत गायीसाठी राखीव ठेवले आहे. येथे असलेल्या गाईच्या गोठ्याची स्वच्छता करणे आणि चारायला घेऊन जाण्यासाठी येथे 10 व्यक्ती मदत करतात.
दारव्हा तालुक्यातील मानकी आंबा येथे संत उद्धव बाबा यांचे मंदिर आहे. येथे अनेक व्यक्तींनी सुरुवातीला जनावरं आणून सोडली. त्याच गायीपुढे नेर येथे आणून त्यांचं संगोपन गोपालक पवन जैस्वाल यांनी संत उद्धव बाबा गोरक्षण येथे सुरु केलं. आज त्यांच्याकडे अनेकांनी गायीसोबत म्हशी, बकऱ्या, मेंढ्यासुध्दा अनेकांनी आणून सोडल्या आहेत. त्यांचेही संगोपन पवन जैस्वाल हे करतात. विशेष म्हणजे, येथे असलेल्या 400 गायींच्या अंगावर 'गोचीड' येऊ नये म्हणून ते येथील 70 कोंबड्यांच्या साहाय्यानं गोचीडवर नियंत्रण ठेवतात. येथे 12 हजार चौरस फुटावर गोठा असून तिथे गायींची देखभाल केली जाते. उन्हाळ्यात गायींना हिरवा चारा मिळेल, अशी व्यवस्था केली जाते.
नेर नगर परिषदचे उपनगराध्यक्ष असलेले पवन जैस्वाल यांचा आवाज ऐकताच या गायी हंबरडा फोडतात. त्यांच्याजवळ धावून येतात मुक्या जनावरांची केलेली सेवा यामुळे पवन जैस्वाल यांची गायींशी नाळ जुळली आहे. येथील गोरक्षणावर जैस्वाल यांना महिन्याला 40 ते 45 हजाराचा खर्च होतो. आपुलकी आणि माये मुळेच ते सर्व करीत असल्याचं त्यांनी सांगितलं. आज जैस्वाल यांच्याकडे 400 गायींची संख्या वाढली आहे. येथे असलेले दूध ते गायीचे वासरू आणि म्हशींचे वगारू यांनाच देतात, शिवाय गायींचे शेण ते शेतात टाकतात. त्यामुळे येथे चाऱ्याची कधीच टंचाई जाणवतं नाही.