Dharmendra Pradhan : समर्थ रामदास नसते तर शिवराय नसते, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या वक्तव्यावरून वाद, सुप्रिया सुळे यांची टीका
Supriya Sule : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे.
मुंबई: राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनंतर आता केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांचे वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे. समर्थ रामदास नसते तर छत्रपती शिवराय (Chhatrapati Shivaji Maharaj) नसते असं त्यांनी एका भाषणात म्हटलं. धर्मेंद्र प्रधान यांच्या वक्तव्यावरुन आता नवीन वाद उफाळण्याची चिन्हं आहेत. प्रधान यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षांतून जोरदार टीका होत आहे. भाजप नेते अशा प्रकारची वक्तव्य वारंवार का करत आहेत? त्यांना काय सिद्ध करायचं आहे? असे प्रश्न राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी विचारला आहे.
काय म्हणाले धर्मेंद्र प्रधान?
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान एका कार्यक्रमाच्या दरम्यान बोलताना म्हणाले की, "विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम शिक्षकांचं असतं. समर्थ रामदास नसते तर शिवाजी नसते. शिवाजी घडवण्याची फॅक्टरी म्हणजे रामदास होते."
धर्मेंद्र प्रधान यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता हा वाद पेटण्याची शक्यता आहे. विरोधकांनी प्रधान यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.
या आधी राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांचे नाते गुरू शिष्याचं असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली होती. नंतर कोश्यारी यांनी त्याबद्दल माफीही मागितली होती.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली आहे. रामदास आणि शिवाजी महाराज यांचे गुरू-शिष्याचे नाते नसल्याचं सिद्ध झाल्यानंतरही भाजपचे नेते असं वक्तव्य का करत आहेत? त्यांना यातून काय सिद्ध करायचं आहे? असे प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारले आहेत.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. 16 जुलै 2018रोजी दिलेल्या निकालानुसार, 'तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही. शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरुशिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही.'
असे असताना भाजपाचे नेते वारंवार अशी दिशाभूल करणारी निखालस खोटी विधाने करुन नेमकं काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापूर्वीही भाजपाच्या नेत्यांनी या पद्धतीची विधाने करुन शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या या विधानाचा निषेध. भाजपाने याबद्दल जनतेची माफी मागितली पाहिजे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. १६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार...
— Supriya Sule (@supriya_sule) October 29, 2023
'तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा… https://t.co/NPM8WEVZlU pic.twitter.com/GnSEdSV5Tx
ही बातमी वाचा: