Rajya Sabha Election 2022 : देशात राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणूक लागली आहे. येत्या 10 जूनला या जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. संख्याबळानुसार महाराष्ट्रात भाजप दोन, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी होणार आहे. तर सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. भाजपकडून कोल्हापूरचे धनंजय महाडिक तर शिवसेनेकडून कोल्हापूरचे संजय पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील भाजपच्या उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये केंद्रीय मंत्री पियूष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
राज्यसभेच्या हमखास निवडून येतील अशा दोन जागांसाठी प्रथम भाजपकडून नावे जाहीर करण्यात आली होती. यामध्ये केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि अनिल बोंडे यांचा समावेश आहे. या दोघांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तिसऱ्या जागेसाठी कोल्हापुरच्या धनंजय महाडिक यांना संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रफुल्ल पटेल यांनी संधी दिली आहे. तर काँग्रेसने या वेळीसुद्धा राज्याबाहेरील उमेदवार दिला असून उत्तर प्रदेशातील प्रख्यात शायर इम्रान प्रतापगढी यांचे नाव निश्चित केले आहे. महाराष्ट्र विधानसभेत सध्या 287 सदस्य आहेत. त्यामधून 6 उमेदवार राज्यसभेवर पाठवायचे आहेत. एका सदस्यास पहिल्या पसंतीची 42 मते आवश्यक आहेत.
संख्याबळ
विधानसभेत भाजपचे 106, शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेसचे 44 या संख्याबळानुसार भाजप 2, काँग्रेस 1, राष्ट्रवादी 1 आणि अपक्ष व छोट्या पक्षांच्या पाठिंब्याने शिवसेनेचे 2 सदस्य निवडून येऊ शकतात. शिवसेनेने संजय राऊत आणि कोल्हापूरचे संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, सहाव्या जागेसाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे. कारण भाजपनं राज्यसभेसाठी धनंजय महाडीकांना तिसरा उमेदवार म्हणून रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळं संभाजीराजेंऐवजी शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेले संजय पवार यांच्यासाठी आता कडवं आव्हान असणार आहे. त्यामुळे आता धनंजय महाडीक आणि संजय पवार या कोल्हापूरच्या राजकीय पैलवानांची राज्यसभेच्या आखाड्यात कुस्ती होणार आहे. या कुस्तीत कोण मैदान मारणार याकडं राजकीय वर्तळाचं लक्ष लागलं आहे.
मला जिंकण्याचा आत्मविश्वास : संजय पवार
भाजपनं कोल्हापुरातून तिसरा उमेदवार दिला असला तरी माझाच विजय होईल असं मत शिवसेनेचे राज्यसभेचे उमेदवार यांनी व्यक्त केलं आहे. महाविकास आघाडी सरकारकडे पूर्ण संख्याबळ आहे. त्यामुळं मला जिंकण्याचा आत्मविश्वास असल्याचे मत संजय पवार यांनी व्यक्त केले आहे. भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक हे माझे मित्र आहेत. त्यामुळं निवडणूक झालीच तर ती मैत्रीपूर्ण आणि हेल्दी वातावरणात होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या: