Onion Export News : सध्या कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कांद्याचे दर कमी झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. दर कमी झाल्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अशातच बांगलादेश सरकारने भारतीय कांद्याची मागणी रोखली असल्याचा प्रकार समोर आला आहे. बांगलादेशमध्ये स्थानिक कांद्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. यामुळं व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे. तसेच कांद्याची मागणी रोखल्यानं कांदा व्यापारी व निर्यातदार  कोंडीत सापडले आहेत.


भारतीय कांद्यासाठी बांगलादेश ही प्रमुख बाजारपेठ 


दरवर्षी बांगलादेश भारताकडून मोठ्या प्रमाणावर कांद्याची आयात करतो. बांगलादेशला बहुतांश कांदा भारतातून निर्यात केला जातो. मात्र, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने 2019 साली निर्यातबंदी केल्यानंतर बांगलादेशकडून मागणी असताना पुरवठा थांबवण्यात आला होता. त्याचा फटका कांदा उत्पादकांना बसला होता. वारंवार निर्यातबंदी केल्यामुळं बांगलादेशने पर्यायी पाकिस्तान, म्यानमार, ब्रम्हदेश आणि अफगाणिस्तान या देशांकडून गरज पूर्ण केली. त्यामुळे स्पर्धक म्हणून इतर देशांनी बाजारपेठ काबीज केली जात आहे. ही बाब देशातील कांदा पिकासाठी आव्हानात्मक बनत आहे. भारतीय कांदा निर्यातदारांसाठी बांगलादेश ही प्रमुख बाजारपेठ आहे. या देशाने असा निर्णय घेतल्याने पुरवठा साखळी पूर्णपणे प्रभावित झाल्याचे अनेक व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, बांगलादेश सरकारनं स्थानिक कांदा लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचबरोबर महसूल वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मात्र, याचा परिणाम महाराष्ट्रातील कांद्याच्या दरावर होत असल्याचे दिसत आहे. आता ही घडी पुन्हा बसण्यासाठी बांगलादेशमध्ये निर्यात सुरळीत राहणं देखील गरजेचं आहे.


महाराष्ट्र सरकार उपायोजना करणार असल्याची कृषीमंत्र्यांची माहिती


राज्यामध्ये कांदा साठवणूक करण्यासाठी स्टोरेजची सुविधा अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे भाव मिळत नसताना तो कांदा साठवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडे कोणताही पर्याय उपलब्ध नाही. याचाच फायदा अडते घेत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक केली जाते. यामुळे काही वेळा शेतकऱ्यांना 50 पैशांनीही कांदा विक्री करावी लागते. बहुतांशवेळी उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. कांद्याच्या दराबाबत राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आज कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे ही वस्तुस्थिती आहे. सरकारला याची जाणीव आहे. त्यामुळे यासंदर्भात काय करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी कांदा चाळीची निर्मिती करणे, चांगल्या वाणाचा कांदा कसा निर्माण करता येईल, जास्तीत जास्त कांदा कसा निर्यात करता येईल तसेच शेतकऱ्यांना चांगल बियाणे कसे देता येतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दादाजी भुसे यावेळी म्हणाले.


महत्वाच्या बातम्या: