Sharad Pawar : राज्यातील अडचणीत सापडलेले साखर कारखाने व त्यामुळं अडचणींत आलेले साखर कामगारांना बाहेर काढण्यासाठी शासन स्तरावर ताबडतोब एक राज्यस्तरीय त्रिसदस्यीय कमिटी स्थापन करण्याच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांनी दिल्या आहेत. त्या कमिटीनं 30 दिवसात अभ्यास करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश या कमिटीला दिले जातील अशी ग्वाही देखील पवार यांनी दिली. इस्लामपूर येथील राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्यावर साखर कामगारांचा भव्य मेळावा पार पडला, यावेळी पवार बोलत होते.
सध्या राज्यातील अनेक साखर कारखाने अडचणीत आहेत. त्यांना अडचणीतून बाहेर काढणे गरजेचे आहे. अडचणीत सापडलेले साखर कारखाने व त्यामुळे अडचणीत आलेले साखर कामगार यांना बाहेर काढण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी संघटना ही महाराष्ट्रातील अत्यंत विधायक अशी संस्था आहे. अनेकदा मतभेद झाले, वादावादी झाली तरी ते कुठपर्यंत न्यायचं याचं तारतम्य संघटनेने ठेवले आहे. भांडण केले, तरी प्रश्न सोडवून घेतले. त्याचे कारण संघटनेमध्ये नेतृत्वाची मालिका होती असेही पवार म्हणाले. यावेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यासह महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस शंकरराव भोसले उपस्थित होते.
साखर कामगारांचे प्रलंबित प्रश्न काय आहेत
1) साखर कामगारांचे थकित वेतन त्वरीत देण्यात यावेत.
2) साखर कामगारांच्या पगारवाढी बाबतचे करार व त्यांची अंमलबजावणी त्वरीत करण्यात यावी.
3) कामगारांच्या पेन्शन वाढीसाठी शरद पवार यांनी लक्ष घालून पेन्शन वाढीसाठी मदत करावी.
4) कायम कामगार सेवा निवृत्त होताना त्याला मिळणारऱ्या ग्र्यॅज्युटी रक्कमेत वाढ करण्यात यावी म्हणजेच एक वर्षाला कायम कामगारांना पंधरा दिवसा ऐवजी एक महिन्याच्या पगार व हंगामी कामगारांना सात दिवसा ऐवजी पंधरा दिवसांचा पगार ग्र्यॅज्युटी म्हणून देण्यात यावा.
5) अनाठायी नोकरी भरती टाळण्यासाठी आकृतीबंध तयार करुन, पगारामध्ये नियमितता आणण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फतच अंकुश ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.
या प्रमुख मागण्या साखर कामगारांच्या मेळाव्यात करण्यात आल्या आहेत. आता या मागण्या मंजूर होणार का? आणि साखर कामगारांना दिलासा मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या: