Rajya Sabha Election 2022 : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहाव्या जागेची निवडणूक आता आणखी रंगतदार होणार आहे. कारण भाजपनं राज्यसभेसाठी धनंजय महाडीकांना तिसरा उमेदवार म्हणून रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळं संभाजीराजेंऐवजी शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेले संजय पवार यांच्यासाठी आता कडवं आव्हान असणार आहे. त्यामुळे आता धनंजय महाडीक आणि संजय पवार या कोल्हापूरच्या राजकीय पैलवानांची राज्यसभेच्या आखाड्यात कुस्ती होणार आहे. या कुस्तीत कोण मैदान मारणार याकडं राजकीय वर्तळाचं लक्ष लागलं आहे.


शिवसेनेकडून राज्यसभेसाठी कोल्हापूरमधील शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते संजय पवार यांनी उमेदवारी मिळाली आहे. त्यानंतर भाजपकडून देखील राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु होत्या. अखेर भाजपने उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. भाजपने कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळं राज्यसभेचा सामना आता कोल्हापूरच्या दोन पैलवानांमध्येचं रंगणार आहे. या दोघांमध्ये कोण राज्यसभेचं मैदान मारणार याकडं राज्याचं लक्ष लागलं आहे.


संख्याबळ पाहता महाविकास आघाडीचं पारडं जड


विजयासाठी 42 मतांची गरज आहे. भाजपकडे सध्या 32 मतं असल्याचा दावा धनंजय महाडिक यांनी केला आहे. जी उर्वरीत 10 मते आम्हाला मिळतील असा दावाही त्यांनी कला आहे.  सध्या भाजपकडे 30 मते आहेत. जनसुराज्य एक आणि रासप एक तसेच अपक्ष पाच अशी सात मते भाजपकडे आहेत. महाविकास आघाडीकडे 41 मते आहेत. शिवनसेनेकडे 13, राष्ट्रवादी 12 तर काँग्रेस 2 तसेच अन्य पक्षांसह काही अपक्षांचा पाठिंबा महाविकास आघाजीला आहे. अशा 41 मतांचा दावा महाविकास आघाडीनं केला आहे. सध्याचं संख्याबळ पाहता महाविकास आघाडीचं पारडं जड आहे. मात्र, भाजपला विजयासाठी अतिरिक्त 10 मतांची गरज आहे. मात्र, भाजपनं त्या मतांची तजवीत केली असल्याचा दावा धनंजय महाडिकांनी केला आहे. थोड्याच वेळात भाजपकडून धनंजय महाडिक, पियूष गोयल आणि अनिल बोंडे हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यापूर्वी धनंजय महाडिकांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे. 


काँग्रेसचीही यादी जाहीर


एकीकडे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना-भाजपमध्ये घमासान सुरु असताना  दुसरीकडं काँग्रेसनेही राज्यसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, या प्रत्येक राज्यातून आयात उमेदवारांनाच संधी देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशातील तरुण नेते आणि अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाराष्ट्राच्या मुकूल वासनिक यांना राजस्थानातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासोबतच हरियाणातून अजय माकन, कर्नाटकातून विवेक तन्खा, राजस्थानमधून  रणदीप सुरजेवाला आणि प्रमोद तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, छत्तीसगडमधून राजीव शुक्ला आणि रंजीत रंजन यांची नावं राज्यसभेसाठी जाहीर करण्यात आली आहेत. यासह पी. चिदंबरम यांना यावेळी तामिळनाडूतून उमेदवारी देण्यात आली आहे. 


महत्वाच्या बातम्या: