बारामती, पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांची दोन्ही मुलं सध्या अॅक्टिव्ह झाल्याचं दिसत आहे. पार्थ पवार हे राजकारणार सक्रिय होतेच मात्र आता त्यांच्या पाठोपाठ त्यांचे धाकटे बंधू जय पवार (Ajit Pawar Son Jay Pawar) राजकारणात येणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यात आता जय पवार यांनी राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत. तुम्ही दादांशी बोलून घ्या, त्यांनी मला सिग्नल दिला की, मी लगेच तयार आहे, असं त्यांनी कार्यकर्त्यांना म्हटलं आहे. 


बारामतीत शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शारदा प्रांगण येथे सभा झाली. पण दोन दिवसांतच अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी बारामतीतील राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयाला भेट दिली. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी जय पवार यांचं औक्षण करत शहर कार्यालयात त्यांचं स्वागत केलं. यावेळी मी तुमच्या सगळ्यांचं कौतूक करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे, असं जय पवार म्हणाले.


लवकरच जय पवार यांनी राजकारणात सक्रिय व्हावं, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. तुम्ही दादांशी बोलून घ्या, त्यांनी मला संकेत दिले की मी लगेच तयार आहे, असं देखील जय पवार म्हणाले. यामुळे जय पवार हे राजकारणात सक्रिय होणार असल्याच्या चर्चांनी राजकारणात जोर धरला आहे. 


काही दिवसांपूर्वी पुण्यात बालेवाडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सतेज करंडक आणि पुणे लीग कबड्डी स्पर्धा 2023 चं उद्घाटन अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. वडील युतीच्या सत्तेत सहभागी होताच पार्थ आणि जय दोघेही अॅक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळालं होतं. 


दोन दिवसांपूर्वी अजित पवार बारामती दौऱ्यावर होते. त्यावेळी अजित पवारांचं बारामतीकरांनी जल्लोषात स्वागत केलं. प्रत्येक चौकात अजित पवारांवर चक्क जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात आली होती. यावेळी अजित पवारांसोबत पार्थ पवारदेखील दिसले. त्यांचंदेखील अनेकांनी स्वागत केलं. सध्या बारामतीकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे. त्यात अजित पवारांनी राष्ट्रवादीत फूट पाडली आहे. त्यानंतर अजित पवार आणि त्यांची दोन्ही मुलं आता राजकारणात सक्रिय झाल्यानं बारामतीत राष्ट्रवादीचं नेमकं काय होणार, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Savitribai Phule Pune University : मार्कशीटसाठी विद्यार्थ्याकडून घेतले पैसे; सावित्रीबाई फुले विद्यापीठातील लाचखोर कर्मचाऱ्याचं अखेर निलंबन