पुणे : पुण्यात PMPML बसचे अपघात काही नवीन नाही. बस चालकाला अपघातासाठी कायम दोषी ठरवलं जातं मात्र याच बस चालकाने प्रसंगावधान दाखवून बसमधील प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. पुण्यातील गणेश खिंड रोडवर हा प्रकार समोर आला आहे. स्टिअरिंग रॉड आणि ब्रेक खराब झाले, ज्यामुळे बस नियंत्रणाबाहेर गेली मात्र प्रसंगावधान राखून चालकाने बस थेट झाडावर नेऊन आदळली. त्यामुळे मोठा अपघात टळला आणि प्रवाशांचा जीवही वाचला आहे. या बस चालकाचं आता सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. 


पुण्यातील गणेश खिंड रोडवर रात्री साडे आठच्या दरम्यान बसचा स्टिअरिंग रॉड आणि ब्रेक खराब झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं. त्यानंतर चालकाने थेट बस झाडावर नेऊन आदळली. यामुळे प्रवाशांना धक्का बसला. प्रवासी भडकले आणि चालकाला दोष देत होते. मात्र काही वेळाने ब्रेक फेल झाल्याने चालकाने जीव वाचवण्यासाठी बस आदळल्याचं कळल्यावर प्रवाशांनी चालकाचे आभार मानले. 


प्रवाशांचा आणि रस्त्यावरच्या नागरिकांचा वाचवला जीव...


गणशे खिंड रोडवर कायम वाहनांची गर्दी असते. त्यात चारचाकी आणि दुचाकीवर स्वार असलेल्या नागरिकांसोबत पायी चालणारे नागरिकदेखील असतात. या चालकाने प्रसंगावधान दाखवून जर बस झाडावर नेऊन आदळली नसती तर अनेक प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता आणि बस सुसाट सुटली असती तर रस्त्यांवरील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. मात्र चालकाने वेळ साधला आणि सगळ्यांचाच जीव वाचला. 


प्रवाशांवर उपचार सुरु...


या धडकेमुळे बसचे नुकसान झाले आणि तिचा विंडस्क्रीन चक्काचूर झाला तर झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून पडल्या. फक्त दोन ते तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने औंध रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले.


PMPML बसचे अपघात वाढले...


पुण्यातील दर दोन दिवसांच्या अंतराने PMPML बसचे अपघात होत आहेत. कधी चालकाचं नियंत्रण सुटून तर कधी ब्रेक फेल झाल्याने हे अपघात होतात. यात मोठी जीवितहानी होत नाही मात्र बसच्या कारभारावर प्रश्नचिन्ह कायम उपस्थित होतं. सात महिन्यात शहरामध्ये PMPML चे तब्बल 58 अपघात झाल्याचं समोर आलं आहे. याच 58 अपघातात 6 जणांचे बळी तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे PMPML प्रशासनाकडून अपघात रोखण्यासाठी दर महिन्याला बसेसची तपासणी केली जाणार असल्याचं PMPML प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Pune PMPML : बस चालकांची अरेरावी चालणार नाही! पुणेकरांनो 'या' नंबरवर तक्रार करा अन् मिळवा...