औरंगाबाद : पावसाने पाठ फिरवल्याने औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. ऑगस्ट महिना अक्षरशः कोरडा गेल्याने आता पिकं माना टाकू लागले आहेत. जमिनीला भेगा पडल्या असून, पिकं जळू लागली आहेत. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत फक्त 47 टक्के पाऊस पडला आहे. मागील वर्षी तीन महिन्यांत 110 टक्के पाऊस झाला होता. तर, 581 मिमीच्या तुलनेत 273 मिमी पावसाचे प्रमाण आहे. त्यामुळे शासन आपल्या दारावर ही योजना राबवण्यापेक्षा शासनाला शेतकऱ्याच्या बांधावर पाठवून पंचनामे करण्याची मागणी होऊ लागली आहे.
गेल्या तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने औरंगाबाद जिल्ह्यात खरीप पिकांची वाढ खुंटली आहे. कोरडवाहू शेतातील पिकांनी माना टाकल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. औरंगाबाद तालुक्यातील निपाणी परिसरात तर बाजरीचे पिकं अक्षरशः करपू लागली आहे. तर जमिनीला भेगा पडत आहेत. सध्या कडक उन्हाळा जाणवत आहे. मागील काळात झालेल्या रिमझिम पावसामुळे कापूस, बाजरी, मका, तूर आदी पिके कशीबशी तग धरुन आहेत. पण समाधानकारक पाऊस नसल्याने त्यांची वाढ खुंटली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात अद्यापही जोरदार पाऊस न झाल्याने नदी, नाले तहानलेले आहेत. विहिरी, बोअरवेलने तळ गाठला आहे. भविष्यात चारा आणि पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती आहे. पावसाअभावी हिरवा चारा उत्पादित करता येत नसल्याने दुधाचे उत्पादन घटल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सध्या 30 गावं आणि 4 वाड्यांना एकूण 41 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे औरंगाबादसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात सुद्धा 33.25 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर गेल्या वर्षी आजच्या दिवशी 98.62 टक्के पाणीसाठा होता.
जायकवाडी धरणाची पाणीसाठा परिस्थिती!
- धरणाची पाणी पातळी फुटांमध्ये : 1506.88 फूट
- धरणाची पाणी पातळी मीटरमध्ये : 459.297 मीटर
- एकूण पाणीसाठा दलघमी : 1459.857 दलघमी
- जिवंत पाणीसाठा दलघमी : 721.751 दलघमी
- जायकवाडी धरणाची पाणीसाठा टक्केवारी : 33.25 टक्के
- जायकवाडी धरण बाष्पीभवन : 0.871
मागील वर्षी आजच्या दिवशीचा
- मागील वर्षी आजच्या दिवशीचा उपयुक्त पाणीसाठा दलघमी : 2141.083 दलघमी
- मागील वर्षी आजच्या दिवशीची उपयुक्त टक्केवारी : 98.62 टक्के
- जायकवाडी पाण्याची आवक क्युसेक : 00
- 1 जून 2023 पासून एकूण पाण्याची आवक : 239.478 दलघमी
- 1 जून 2023 पासून एकूण सोडलेला विसर्ग : 1.041 दलघमी
इतर महत्वाच्या बातम्या: