Jayant Patil Corona Positive : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. जयंत पाटील यांनी ट्वीट करुन आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी नुकतंच राज्यभर परिवार संवाद यात्रा केली होती. याला जोरदार प्रतिसाद देखील मिळाला होता. तसेच परवा राष्ट्रवादी कार्यालयात त्यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला.


जयंत पाटील यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो. जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.





मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं पण...,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली इच्छा


मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ 


मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. शहरातील परिस्थिती सुधारत असताना कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनाचे 721 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी कोरोनामुळे तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईत आतापर्यंत मृतांचा आकडा 11428 आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत सध्या कोरोनाचे 5143 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. यातील 82 टक्के लोकांवर घरी उपचार केले जात आहेत. म्हणूनच सध्या रुग्णालयांवर सध्या कोणताही परिणाम दिसून येत नाही. कोरोनाचे जवळपास 18 टक्के रुग्ण उच्चभ्रू वस्तीत आढळले आहेत. सध्या शहराचा पॉझिटव्ह रेट 4.50 टक्के आहे.


राज्यात कोरोना विषाणूची 4787 नवीन प्रकरणे, 40 जणांचा मृत्यू


राज्यात काल एकूण 4787 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यावर्षीची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले की, एकूण कोरोनाबाधितांची संख्या 20,76,093 वर पोहोचली आहे. अमरावतीत सर्वाधिक रुग्णांची वाढ झाली आहेत. अमरावतीत मंगळवारी 82 रुग्ण आढळले होते बुधवारी त्यांची संख्या 230 वर पोहोचली होती.


सलग आठव्या दिवशी तीन हजारांहून अधिक रुग्ण


कोरोना व्हायरसमुळे 40 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मृतांचा आकडा 51,631 वर पोहोचला आहे. दिवसभरात 3853 रुग्णांना वेगवेगळ्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढून 19,85,261 झाली आहे. राज्यात सध्या 38,013 लोकांवर उपचार सुरू आहेत. एका दिवसात तीन हजाराहून अधिक रुग्ण आढळण्याचा हा सलग आठवा दिवस आहे. गेल्या काही दिवसातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्याचे दर्शवत आहे.