Baramati News Update : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) आज बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांच्या काटेवाडी गावात एक तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमाची सुरुवात आज करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान लोकांनी अजित पवार यांच्यासमोर विविध समस्या सांगण्यास सुरुवात केली. त्यामुळे अजित पवार यांनी तेथेच जनता दरबार सुरू केला. कार्यक्रमात एका नागरिकाने जागेच्या मोजणीवरून सुरू असलेल्या वादाची तक्रार मांडली. दोन गटात वाद असल्यामुळे समोरचा व्यक्ती ऐकत नाही असे सांगितल्यानंतर अजित पवार संतापलेले पाहायला मिळाले. या तक्रारीनंतर त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या डीवाएसपींना आदेश दिला. "यांची एकत्र बैठक घेऊन मेळ बसतोय का पहा. या प्रकरणात अजित पवार आडवा आला तरी त्याला उचला अशा कडक सूचना अजित पवार यांनी यावेळी दिल्या.
बारामतीचे प्रांत अधिकारी दोन टक्के कमिशन घेतात ; भर सभेत शेतकऱ्याची तक्रार
संत तुकाराम महाराज पालखी मार्गात घर गेले आहे. परंतु, त्याचा मोबदला मिळत नसल्याची तक्रार एका नागरिकाने यावेळी केली. त्यावर तोडगा काढण्यासाठी बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना अजित पवार सूचना देत होते. याचदरम्यान, सभेत उपस्थित असलेल्या एका ग्रामस्थाने पालखी मार्गातील नुकसान भरपाई देण्यासाठी प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे दोन टक्के कमिशन घेत असल्याची तक्रार केली. भर सभेत असा आरोप झाल्याने उपस्थितांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यावर अजित पवार यांनी मात्र, कपाळाला हात लावत आश्चर्य व्यक्त केले. त्याचवेळी स्वीय सहाय्यक हनुमंत पाटील यांना संबंधित शेतकऱ्याचा प्रश्न सोडवण्याच्या सूचना देखील दिल्या.
दरम्यान, अजित पवार यांनी यावेळी त्यांच्या घरी झालेल्या चोरीचा किस्सा सांगितला. या सभेत एका महिलेने आम्हाला घरकुल द्या अशी मागणी केली. यावेळी घरकुल देतो, परंतु, शासनाच्या व आमच्या पद्धतीने, असे सांगत त्यांच्या घरी झालेल्या चोरीचा एक किस्सा सांगितला. "त्या वेळी आई म्हणाली होती, कुठल्या मुडद्यानं कुणाचा टीव्ही आणून टाकला आहे काय माहिती? त्यावर आई हा आपल्याच घरातील टिव्ही आहे, आपल्याच घरात चोरी झाली होती." असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या