Raosaheb Danve vs Ajit Pawar :   भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) त्यांच्या वक्तव्यामुळे बरेचदा चर्चेत असतात. त्यांचं आणखी एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. 'ब्राम्हणाला या राज्याचा मुख्यमंत्री (Maharashtra CM)झाल्याचं पाहू इच्छितो असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. 3 मे रोजी जालन्यात आयोजित परशुराम जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना दानवेंनी हे वक्तव्य केलं. हे वक्तव्य समोर आल्यानंतर त्याला शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. नसत्या भानगडी सोडा असं म्हणत त्यांनी दानवेंनाच टोला हाणला आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांनी देखील दानवेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
 
नेमकं काय म्हणाले रावसाहेब दानवे


केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, मी केवळ ब्राह्मणाला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पाहू इच्छित नाही ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री पाहू इच्छितो. या देशाला दिशा देण्याचे काम आपण सर्व (ब्राम्हण) समाजानं केलं असल्याचेही दानवे म्हणाले.


तृतीयपंथी पण मुख्यमंत्री होऊ शकतात - अजित पवार
रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,  राज्यात विशिष्ट जातीचा मुख्यमंत्री व्हावा असं म्हणणे योग्य नाही.  तृतीयपंथी पण मुख्यमंत्री होऊ शकतात. यात काहीच हरकत नाही. मात्र जे कोणी 145 चा बहुमताचा आकडा जमवू शकतील त्यांचा मुख्यमंत्री बसेल, असं अजित पवार म्हणाले. 


सध्या राज्याचे मुख्यमंत्री ब्राह्मणच- अर्जुन खोतकर 
दरम्यान या कार्यक्रमात दानवे यांच्या भाषणाला प्रत्युत्तर देताना शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी सध्या राज्याचे मुख्यमंत्री ब्राह्मणच असल्याचे सांगून नवीन करण्याच्या भानगडी सोडून द्या, असे म्हणत दानवे यांना टोल लगावला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


OBC Reservation : राज्य सरकारला दणका; दोन आठवड्यात निवडणूक जाहीर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा अर्थ