Monsoon News : मान्सूनचे आगमन नेमकं कधी होणार, याविषयी हमानाचा अभ्यास करणाऱ्या संस्था त्यांचा-त्यांचा अंदाज व्यक्त करत असतात. असाच यावर्षीच्या मान्सूनचा अंदाज 'युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर फोरकास्ट' या संस्थेने वर्तवला होता. या संस्थेने यावर्षी भारतात 10 दिवस आधीच म्हणजे 20 ते 21 मे च्या दरम्यान मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, अशा मान्सून  संदर्भात काही दिशाभूल करणाऱ्या बातम्या अनेकजण पसरवत आहेत, त्याकडे दुर्लक्ष करावं असे मत भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक आणि पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केलं आहे. 


मान्सून संदर्भातील अशा खोट्या बातम्यांमुळं अनेकांचे नुकसान होईल. भारतीय हवामानशास्त्र विभागानं अद्याप मान्सून दाखल होण्यासंदर्भात कोणताही माहिती दिली नसल्याचे होसाळीकर यांनी म्हटलं आहे. मान्सून संदर्भातील अशा खोट्या बातम्यांकडे दुर्लक्ष करा असे होसाळीकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आल्यानंतरच परिस्थिती समजणार आहे.






 


भारतीय हवामान विभागाचा अंदाज वाचायला शिकावा :  उदय  देवळाणकर


दरम्यान, युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर फोरकास्ट या संस्थेनं वर्तवलेल्या अंदाजासंदर्भात एबीपी माझा डीजिटलने कृषी आणि हवामानाचे अभ्यासक उदय देवळाणकर यांच्याशी संपर्क साधला. यावेळी देवळाणकर म्हणाले की, हवामानाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था आहे. मात्र, 'आपण भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) अंदाज देईल, त्यावर विश्वास ठेवाव. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानंतरच आपलं मतं किंवा निर्णय घ्यावा अशी माहिती देवळाणकर यांनी दिली. आयएमडीचा अंदाज आपण वाचायला शिकावे' असेही त्यांनी सांगितले. कारण आयएमडीचा 85 टक्के अंदाज हा बरोबर येतो. स्कायमेटचा अंदाज 40 टक्क्यांच्या आसपास बरोबर येतो असे देवळाणकर म्हणाले. त्यामुळे भारतात 27 ते 29 मे दरम्यान मान्सून दाखल होईल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर फोरकास्ट या संस्थेने दिलेला अंदाज पूर्णत: बरोबर आहे हे म्हणणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.


मस्करीन हाय तयार झाल्यामुळे विषुववृत्ताच्या दक्षिण भागात तापमान वाढत आहे. त्यामुळे विषुववृत्ताच्या उत्तर दिशेने वारे वाहत आहे. हा मान्सूनच्या दृष्टीने चांगला संकेत आहे. मात्र, त्यामुळे मान्सून खूप अलिकडे येईल, असे म्हणणे बरोबर ठरणार नाही असे देवळाणकर यांनी सांगितले. मान्सून अलिकडेच येईल असे सांगणे खूप घाईचे होईल असे ते म्हणाले. भारतीय उपखंडातील परिस्थिती अनुकूल झाल्याशिवाय आपल्याकडे मान्सून येईल असे म्हणता येणार नाही असंही त्यांनी सांगितले. 


महत्त्वाच्या बातम्या: