Deepak Kesarkar : मोदी अन् पवारांचे नाव घेत दीपक केसरकरांची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले, 'तुम्ही शब्द मोडला'
Deepak Kesarkar : तुम्ही मोदीजींना शब्द दिला आणि पवार साहेबांनी मन वळवलं तर शब्द मोडला, असे हल्लाबोल मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर केला आहे.
Deepak Kesarkar : मी राष्ट्रवादीत होतो, तुम्ही मला आमदार नाही केलं, जनतेनं मला आमदार केलं. चार पिढ्यांना पुरेल इतकी संपत्ती माझ्याकडे आहे. कोणाला खोके म्हणता तुम्ही? खोके म्हटलं तर सहन केलं जाणार नाही. मोदींनी तुम्हाला बाहेर नाही केलं तुम्ही बाहेर गेलात. मोदी तुम्हाला भेटायला तयार नव्हते तेव्हा मी तुम्हाला भेटवून दिलेलं आहे. तुम्ही नरेंद्र मोदीजींना (PM Narendra Modi) शब्द दिला आणि पवार साहेबांनी (Sharad Pawar) मन वळवलं तर शब्द मोडला, असे हल्लाबोल मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केला आहे.
दीपक केसरकर म्हणाले की, काल उद्धवजी सावंतवाडीत होते. मी साईभक्त आहे आणि हे लपवून ठेवलेलं नाही. ते जे बोलले ते चुकीचं आहे. जे खरोखर भक्त असतात ते स्वार्थासाठी कोणाकडे जात नाही. उद्धव साहेब बोलतात हे खोटं आहे. ते भाजपबरोबर जाणार होते. आता नवीन राज्य येणार नाही तुम्ही नवीन मंत्री असणार असं त्यांनी सांगितलं होतं. मी कधीही मला शिवसेनेत घ्या, असं सांगितलं नव्हतं. तुम्हाला हॉटेलमध्ये जागा मिळत नव्हती, नारायण राणेंचा दरारा होता. तुम्हाला किती मतं मिळत होती, सरासरी काढून बघा, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
जनतेनं मला आमदार केलं
तेव्हा मी राष्ट्रवादीत होतो, तुम्ही मला आमदार नाही केलं, जनतेनं मला आमदार केलं. मी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलो. तेव्हा ५० हजारांवरून दीड लाखांवर गेलो. चार पिढ्यांना पुरेल इतकी संपत्ती माझ्याकडे आहे. कोणाला खोके म्हणता? यापुढे खोके म्हंटलं तर सहन केलं जाणार नाही.
पाणबुडी प्रकल्पासंदर्भात मी पैसे दिले
बाबर यांना पाणी सुद्धा तुम्ही देऊ शकले नाही, त्यांना तुम्ही खोके म्हणता. लोकं बाहेर का जातात याचा विचार करा. आम्ही बोलत नाही कारण आम्हाला तुमचा आदर आहे. मोदींनी तुम्हाला बाहेर नाही केलं तुम्ही बाहेर गेलात. अडीच वर्षात काजूसाठी तुम्ही एक रुपयाही दिला नाही. पाणबुडी प्रकल्पासंदर्भात मी पैसे दिले. आदित्यने एक रुपया पैसा खर्च केला नाही. सात वर्षाआधी हा प्रकल्प मंजूर केलाय, असे दीपक केसरकर म्हणाले.
नारायण राणेंनी कामं केली तुम्ही काय केलं?
मोदी तुम्हाला भेटायला तयार नव्हते. तेव्हा मी तुम्हाला भेटवून दिलेलं आहे. लोकांवर खोटे आरोप करु नका. मतदार संघांतील कामं होत नाही, तुम्ही लोकांना भेटत नाही. मला मंत्रिपद पाहिजे असतं तर मी तेव्हा तुमच्या मागे आलो असतो. तुमची सत्ता आली तर मी मंत्रिपद घेणार नाही. नारायण राणेंनी कामं सुद्धा केली तुम्ही काय केलं? असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
तुम्हाला कोणी माफ करणार नाही
तुमचा मुंबई पालिकेचा वाद झाला. तेव्हा वाद संपवण्यासाठी शिंदे साहेब आणि मी पुढाकार घेतला. खोके वगैरे आम्ही तुम्हाला दिले असते ना? आणि पुन्हा मंत्री झालो असतो. खादीची वस्त्र उगीच नाही परिधान केली आहेत. तुम्ही साहेबांच्या विचारांसोबत राहायला पाहिजे होतं. काँग्रेस मतांसाठी मुस्लिमांकडे बघतं यावर आमचा आक्षेप होता. हिंदुत्व सोडलं नाही असं का म्हणता? तुम्ही मतांसाठी जे करता आहात त्यावर तुम्हाला कोणी माफ करणार नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
तुमचे खासदार निवडून आले ते माझ्यामुळे
तुम्ही स्वत: मला बोलवून सांगितलं कॅबिनेट मंत्रीपद देऊ शकत नाही. तुम्ही मुख्यमंत्री झाला आम्हाला आनंद आहे. कोणत्या सालात तुम्ही पाणबुडीसाठी पैसे दिले हे दाखवा मला. आम्ही जे केलं नाही, ते आम्ही ऐकून घेणार नाही. तुमचे खासदार निवडून आले ते माझ्यामुळे निवडून आलेले आहेत, असे देखील केसरकर म्हणाले.
तुम्ही खरं बोला ऐवढीच विनंती
आम्ही साधी माणसं आहोत. तुम्ही मोदींना शब्द दिला आणि पवार साहेबांनी मन वळवलं तर शब्द मोडला. तुम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं तर तेव्हा बोलायला पाहिजे होतं. तुम्ही मला म्हंटलं तुम्ही देखील निघून जा. तुम्ही खरं बोला ऐवढीच विनंती असल्याचेही ते म्हणाले.
काँग्रेससमोर हिंदुत्वाबद्दल बोला
आम्हाला कोणती अपेक्षाच नाही. मी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं तुम्ही मुख्यमंत्री असताना मी मंत्री होणार नाही. हिंदुत्वाबदद्ल तुम्ही अजूनही बोलता. काँग्रेससमोर हे बोला, ते युती तोडून टाकतील. तुम्ही तुमच्या मतदारांना सोडलं मात्र काँग्रेस कॉमन मिनिमम प्रोग्रामवर सही नाही केली. कोणाला काम दिलं तुम्ही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
आणखी वाचा