kolhapur News : जुनोनी (ता. सांगोला) गावाजवळ कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला जात असताना दिंडीमध्ये भरधाव कार घुसून गंभीर जखमी झालेल्या सरिता अरुण शियेकर (वय 45, रा. जठारवाडी, ता करवीर) यांचा पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या आता 8 वर पोहोचली आहे. पंढरपूरहून त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून आज जठारवाडीत आणण्यात आला. 


टाळ मृदंगाच्या गजरात अंत्ययात्रा काढून शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. सरिता शियेकर यांच्या मृत्यूमुळे या अपघातातील ठार झालेल्यांची संख्या आता 8 झाली आहे. या घटनेतील 6 जण जठारवाडी येथील होते. अन्य जखमी असलेल्या जठारवाडीमधील सुभाष काटे व अनिता जगदाळे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.  दुसरीकडे अनिता जाधव यांच्यावर कोल्हापूरमध्ये, तर शानुताई शियेकर यांच्यावर सोलापूरमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


सांगोल्यात भीषण अपघात


विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीत काल सायंकाळी (31 ऑक्टोबर) कार घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी सहा जणांचा जागीच, तर एका वारकऱ्याचा रुग्णालयात नेल्यानंतर मृत्यू झाला. पाच वारकरी जखमी झाले आहे. जखमी वारकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पाच महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. 


कार दिंडीत घुसली आणि वारकऱ्यांना चिरडलं


काल सायंकाळी सात वाजता ही दिंडी सांगोला तालुक्यातील जुनोनी इथल्या बायपास रस्त्याजवळ आली असताना मिरजेकडून भरधाव वेगाने येणारी कार दिंडीत घुसली आणि वारकऱ्यांना चिरडत पुढे गेल्याने सात जणांचा मृत्यू झाला. अपघात झालेली कार सांगोला तालुक्यातील सोनंद गावातील असून यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


पालकमंत्री दीपक केसरकर, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून सांत्वन 


पंढरपूरला कार्तिकी एकादशीसाठी पायी निघालेल्या दिंडीत कार घुसून झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांचे कुटुंबीय व नातेवाईकांची कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांत्वनपर भेट घेऊन दुःख व्यक्त केले आहे. 


मृत वारकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा


दरम्यान, दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या