Lumpy Skin Disease : देशातील विविध राज्यात जनावरांना लम्पी स्कीन आजाराची (Lumpy Skin Disease) लागण झाली आहे. महाराष्ट्र राज्यातही लम्पी स्कीन आजाराचा धोका वाढला आहे. राज्यातील जवळपास 33 जिल्ह्यांमध्ये जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे. त्यामुळं पशुपालक चिंतेत आहे. दरम्यान, लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून, गुरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत. जनावरांचे बाजार बंद केल्यामुळं नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (Nandurbar Agricultural Produce Market Committee) लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. 


लम्पी आजाराच्या प्रादुर्भावामुळं राज्य सरकारनं राज्यातील सर्वच जनावरांचे बाजार बंद ठेवण्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका नंदूरबार जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीला बसत आहे. नंदूरबार जिल्ह्यातल्या तळोदा अक्कलकुवा आणि नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात जनावरांचे बाजार भरत असतात. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, लम्पी प्रादुर्भावानंतर बाजार समितीमधील जनावरांचे बाजार बंद असल्यानं रब्बी हंगामासाठी बैल खरेदी करणाऱ्या तसेच ऊस तोडणीसाठी बैल जोडी खरेदी करणाऱ्या ऊस तोड कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत  आहेत. त्यामुळं बैल बाजार कधी सुरु होणार याची प्रतीक्षा आता सर्वांना लागली आहे.


 धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत 35 कोटींची उलाढाल ठप्प


लम्पी स्कीन आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेल्या दोन महिन्यांपासून धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत (Dhule Agricultural Produce Market Committee) भरणारा गुरांचा आठवडे बाजार बंद करण्यात आला आहे. लम्पी या संसर्गजन्य आजारामुळं गुरांच्या खरेदी विक्रीतून त्याचा प्रादुर्भाव वाढू नये  यासाठी बाजार बंद करण्यात आले आहेत. मात्र, यामुळं 35 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथील व्यापारी मोठ्या प्रमाणात येत असतात. तसेच राज्यातील इतर भागातून देखील मोठ्या प्रमाणावर जनावरे विक्रीसाठी धुळ्यात येत असतात. तसेच व्यापारीही या ठिकाणी येत असतात. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, हा गुरांचा बाजार बंद असल्यानं ही उलाढाल ठप्प झाली आहे. यामुळं शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचा वातावरण पसरलं आहे. वाढत्या लम्पी आजाराच्या प्रादुर्भावामुळं धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरणारा जनावरांचा बाजार बंद करण्यात आला आहे.


97 टक्क्यांहून अधिक जनावरांना लसीकरण पूर्ण


राज्यात 33 जिल्ह्यांमध्ये जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे. त्यामुळं पशुपालक चिंतेत आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील एकूण 1 लाख 72 हजार 528 जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला आहे. या बाधित जनावरांपैकी 1 लाख 12 हजार जनावरे बरी झाली आहे. तर आत्तापर्यंत राज्यात 97 टक्क्यांहून अधिक जनावरांना लसीकरण पूर्ण झाले आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Lumpy Skin Disease : महाराष्ट्रात लम्पीतून आत्तापर्यंत 1 लाख 12 हजार जनावरे बरी, 97 टक्के लसीकरण पूर्ण