Bharat jodo yatra : काश्मीर ते कन्याकुमारी देशभ्रमण करत असलेली काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात नांदेडमध्ये येत आहे. आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून या यात्रेच्या समर्थनार्थ राज्यातील नव्हे, तर देशातील पहिला मेळावा कोल्हापूरमध्ये घेण्यात आला होता. कोल्हापूरमधून 10 हजार कार्यकर्ते या यात्रेसाठी रवाना होणार आहेत. दरम्यान, या यात्रेत कोल्हापुरी बाणा झळकणार आहे. सतेज पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. 


सतेज पाटील माहिती देताना म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील सहा काँग्रेसचे आमदार, 12 तालुकाध्यक्ष तसेच पदाधिकारी असतील या सर्वांना प्रदेश काँग्रेसकडून या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी 12 नोव्हेंबर रोजी सकाळी हिंगोलीमध्ये आम्हाला वेळ दिली आहे. त्यामुळे काही लोक 10 तारखेला संध्याकाळी कोल्हापूरमधून निघतील, तर काही लोक 11 तारखेला सकाळी निघून मुक्कामासाठी हिंगोलीत पोहोचतील. 12 तारखेला सकाळी सहा वाजता कोल्हापूरचे एक वेगळेपण दाखवत सगळेजण यात्रेमध्ये सहभागी होऊन राहुल गांधी यांना पाठिंबा देणार आहेत. ते पुढे म्हणाले की, कोल्हापूरमधून येणारे सगळे लोक कोल्हापुरी फेटा बांधून त्या ठिकाणी जातील आणि 'कोल्हापुरी बाणा' हा या भारत जोडो यात्रेमध्ये निश्चितपणे आपल्याला दिसून येईल, असेही त्यांनी नमूद केले. 


देशातील आत्ताचे वातावरण गढूळ आहे. हे गढूळ वातावरण दुरुस्त करण्याचा जो त्यांचा प्रयत्न चालला आहे, त्याला पाठबळ देण्यासाठी आम्ही सगळे जात आहोत, असेही ते म्हणाले. 


पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला


पश्चिम महाराष्ट्रात यात्रा येत नसल्याबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचा कधी विषय नव्हता. यात्रेचा रूट पूर्वीच ठरला आहे. ती सरळ यात्रा जात असल्याने गाडी थांबवून आम्ही ती यात्रा बाजूला करू शकत नाही. पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, आताही आहे नाही. म्हणून पश्चिम महाराष्ट्रातून देखील प्रत्येक जिल्ह्यातून दहा-पंधरा हजार लोक या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. पाटील पुढे म्हणाले की, गुजरात असेल, कर्नाटक, हिमाचल असेल या सगळ्या राज्यांमध्ये देखील लोकशाही अबाधित ठेवणाऱ्या पक्षाबरोबर सामान्य माणसे येतील. 


देशातील परिस्थिती अत्यंत बिकट 


यावेळी बोलताना सतेज पाटील यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले, एकूण देशातील परिस्थिती बघितली तर अत्यंत बिकट परिस्थिती आहे. एकमेकांबद्दलची विश्वासार्हता कमी होत चालली आहे. आयटी कायद्याच्या माध्यमातून काही अधिकार केंद्र सरकार स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करत आहे. सिक्युरिटीच्या नावाखाली किंवा सामाजिक तेढ निर्माण होऊ नयेत या नावाखाली अधिकार हातात घेत आहे असे मला वाटते. लोकशाही संपवायचं चाललं आहे. त्यामुळे लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी राहुल गांधी यात्रा करत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या