Aurangabad News: औरंगाबादच्या पळशी परिसरात नियमबाह्य शंकरपटाच्या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. त्यामुळे याची माहिती मिळताच चिकलठाणा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत आयोजकांकडे परवानगीबाबत विचारणा केली. मात्र आयोजकांकडे परवानगी नसल्याने पोलिसांनी स्पर्धा थांबवल्या. त्यामुळे आयोजक आणि पोलिसात हुज्जत झाली. दरम्यान परस्थितीचे गांभीर्य पाहता पोलिसांनी स्पर्धक व शंकरपट बघण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना सौम्य लाठीचार्ज करत तेथून हुसकावून लावले. 


मिळालेल्या माहितीनुसार, शहरालगत असलेल्या पळशी शिवारात सचिन पळसकर यांनी आत्माराम पळसकर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी शंकरपटाचे आयोजन केले होते. यासाठी 1 हजार ते 21 हजारापर्यंत बक्षीस ठेवण्यात आले होते. शंकरपट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शहर जवळपासच्या खेड्यांतील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.तर मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश येथील स्पर्धक देखील सहभागी झाले होते. परंतु शंकरपट आयोजनासाठी रीतसर परवानगी घेतली नव्हती.


पोलिसांकडून लाठीचार्ज


सकाळी शंकरपटाला सुरवात झाली. दरम्यान, पळशीत शंकरपटाच्या स्पर्धा सुरू असल्याचे चिकलठाणा पोलिसांना कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आयोजकांना शंकरपट बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी आयोजक आणि पोलिसात शाब्दिक चकमक झाली. पोलिसांच्या आवाहनानंतर शंकरपट बंद करण्याऐवजी आयोजकांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. याचवेळी नेमकं काय झालं म्हणून, बघ्यांची सुद्धा गर्दी वाढू लागली होती. आयोजक व पोलिसांत सुरु असलेली शाब्दिक चकमक बऱ्याच वेळ चालली होती. त्यातच बघेपण जाण्यास तयार नव्हते. त्यामुळे परस्थितीचे गांभीर्य पाहून पोलिसांनी अधिकची कुमक मागवून घेतली. त्यानंतर पुन्हा आवाहन केलं, मात्र फरक पडत नसल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार सुरु केला. 


आयोजकांवर गुन्हा दाखल...


शंकरपटाच्या स्पर्धा भरवण्याबाबतची बंदी न्यायालयाने उठवली आहे. मात्र असे असतांना देखील यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून रीतसर परवानगी घ्यावी लागते. मात्र पळशी येथे आयोजित करण्यात आलेल्या शंकरपट स्पर्धेसाठी परवनागी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे चिखलठाणा पोलिसांनी सहा ते सात आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. 


पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेताच पळापळ...


रीतसर परवानगी नसल्याने पोलिसांनी शंकरपट स्पर्धा बंद करण्याचे आवाहन केल्यावर देखील आयोजक आयकण्याच्या परिस्थितीत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. पोलिसांची आक्रमक भूमिका पाहताच स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या लोकांची पळापळ पाहायला मिळाली. तर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या अनेकांनी आपले बैल आणि गाड्यासह धूम ठोकली. त्यामुळे काही क्षणात गर्दी पांगली. त्यानंतर पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.