Pune Chaturshringi Temple History : पुण्यात अनेक देवीदेवतांचे (Pune) मंदिरं आहेत. प्रत्येक मंदिराचं वैशिष्ट्य, त्याचं महत्व आणि बांधकाम प्राचीन आणि आकर्षक आहे. पुण्यात जसा गणेशोत्सव साजरा केला जातो त्याच उत्साहात नवरात्रोत्सव देखील साजरा केला जातो. पुण्यातील सर्वात मोठं आणि जागृत देवस्थान असलेलं सेनापती बापट रोडवरील चतु:श्रृंगी देवीच्या (Chaturshringi Temple History) मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाते. पुणेकरच नाही तर जगभरातील भाविक या मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी करतात.
चतुश्रुंगी मंदिराची रचना
या मंदिराच्या नावाचा पहिला शब्द 'चतुर' म्हणजे 'चार' आणि म्हणून चतु:श्रृंगी म्हणजे चार शिखरे असलेला पर्वत. मंदिर खूप मोठं असून 90 फूट उंच आणि 125 फूट रुंद आहे. हे मंदिर शक्ती आणि विश्वासाचे प्रतीक आहे. मंदिर सेनापती बापट रस्त्यावरील टेकडीवर आहे. चतु:श्रृंगी देवी ही या मंदिराची प्रमुख देवता आहे आणि देवीला अंबरेश्वरी देवी असंही म्हणतात. पुण्याच्या मध्यभागी असलेलं हे मंदिर उंचावर आहे. देवीला जाण्यासाठी भरपूर पायऱ्या चढाव्या लागतात. या मंदिरात गणपतीचे मंदिरदेखील आहे. या मंदिराच्या देखभालीचे काम चतु:श्रुंगी देवस्थान ट्रस्टकडे सोपवण्यात आले आहे. हे मंदिर शक्ती आणि विश्वासाचे प्रतीक मानले जाते. अनेक पुणेकरांची या देवीवर मोठी श्रद्धा आहे. देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी जगभरातून लोक येतात. धार्मिकदृष्ट्या या मंदिराला खूप महत्त्व असून ज्येष्ठ नागरिकही 100 पायऱ्या चढून देवीच्या दर्शनासाठी येतात.
चतु:श्रृंगी मंदिराचा इतिहास
पेशव्याच्या काळात सुमारे 300 वर्षापूर्वी दुर्लक्षे नावाने पेशव्यांचे सावकार होते. ते पेशव्यांच्या मोहिमांना कर्ज द्यायचे. नाशिकच्या वणीच्या सप्तश्रृंगी मातेचे परमभक्त होते. प्रत्येक चैत्र आणि अश्विन पौर्णिमेच्या दोन्ही नवरात्रोत्सवात हे सावकार त्याकाळी प्रवास करुन दर्शनासाठी जायचे आणि देवीची सेवा करायचे. घोडा गाडी, बैल गाडी तर कधी चालत ते देवीची सेवा करण्यासाठी वणीला जायचे. असे अनेक वर्ष त्यांनी देवीची सेवा केली मात्र वृद्धापकाळाने त्यांना वणीला जाणं शक्य नव्हतं. देवीची सेवा करता येणार नसल्याने त्यांना दुख: झालं. त्यावेळी देवीने त्यांचं दुख: जाणलं आणि देवी भक्तासाठी प्रकट झाली. पुण्याच्या डोंगरावर उत्खनन करायला सांगितलं. माझी मूर्ती मिळेल असंही सांगितलं. सांगितलेल्या ठिकाणी भक्ताने उत्खनन केल्यानंतर भक्ताला चांदळास्वरुप (मुखवटा) मूर्ती मिळाली. त्याप्रमाणे भक्तासाठी ही देवी पुण्याच्या चतु:श्रृंगी नावाने प्रकट झाली. देवी प्रकट झाल्याने त्यांना प्रचंड आनंद झाला. त्यांची टांकसाळ होती. त्या टांकसाळीत त्यांनी देवीचा एक चांदीचा रुपया बनवला आणि त्याकाळी त्यांनी चतु:श्रृंगी रुपया नावाने प्रचलित केला होता.
चतु:श्रृंगी मंदिराच्या परिसरात रँडच्या वधाचा कट
चतु:श्रृंगी मंदिराच्या परिसरातील पार्वतीनंदन गणपती मंदिरात बसून चाफेकर बंधूंनी रँडच्या वधाचा कट रचला होता. त्यावेळी त्यांनी या गणपतीचे आशीर्वाद घेतले, देवीची आराधनाही केली. आम्हाला या कटात यश मिळू दे अशी इच्छा व्यक्त केली. त्यात चाफेकरांना यश मिळालं. त्यावेळी त्यांनी सांकेतिक भाषेत लोकमान्य टिळकांना खिंडीतील गणपती पावला, असा निरोप दिला होता. त्याच वेळी लोकमान्य टिळकांनी रॅंड कसा होता आणि त्याचा वध कसा करण्यात आला यासंदर्भात टिळकांनी लेख लिहिला होता.